वृद्धिमान साहा आणि पत्रकार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर BCCIला जाग आली आणि त्यांनी भारतीय क्रिकेटपटूला धमकावणाऱ्या पत्रकारावर कारवाईची तयारी दाखवली. पत्रकार व खेळाडू यांच्यातील वादाची ही काही पहिली घटना नाही. याआधीही असे खटके उडालेले पाहायला मिळाले आहेत. पण, राहुल द्रविड ( Rahul Dravid) आणि पत्रकाराशी वाद ही घटना अनेकांसाठी अनपेक्षित आहे. भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची प्रतिमा म्हणजे शांत, संयमी, सुसंस्कृत अशी आहे. त्यामुळे द्रविडाला कधी चिडलेला कुणी पाहिलंच नसावं. नुकतीच त्याने एका जाहीरातीसाठी 'इंदिरानगरका गुंडा' अशी भूमिका साकारली जी त्याच्या प्रतिमेच्या परस्पर विरोधी होती. द्रविडचा तो अवतार लोकांना आवडला, पण खऱ्या आयुष्यातही द्रविड एकदा भडकला होता.
२०१४च्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने १९५ धावांचे लक्ष्य १४.४ षटकांत पार केल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात असलेल्या द्रविडने कॅप फेकून राग व्यक्त केला होता. शांत स्वभागाच्या राहुल द्रविडच्या रोषाचा सामना पाकिस्तानच्या पत्रकाराला करावा लागला होता. २००४ सालचा हा प्रसंग आहे. चार सामन्यांच्या या मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर होता आणि लाहोर येथे अखेरचा सामना झाला. त्यात कर्णधार इंजमाम-उल-हक याच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने २९३ धावांचा डोंगर उभा केला. पण, भारताने पाच षटकं राखून हा सामना जिंकला. राहुल द्रविड ( ७६*) व मोहम्मद कैफ ( ७१*) यांच्या १३२ धावांच्या भागीदारीने हा विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर पाकिस्तानी पत्रकाराने मॅच फिक्सिंगचा आरोप केला. त्या पत्रकार परिषदेत इंजमाम व द्रविड दोघेही होते आणि दोघ पत्रकारावर भडकले. इंजमामने त्याला गप्प राहण्यास सांगितले, पण द्रविड फार भडकला. त्याने या प्रश्नावर नॉन्सेन्स अशी प्रतिक्रिया दिलीच, शिवाय त्याने त्या पत्रकाराला कॉन्फरेन्स रूमबाहेर फेकावेसे वाटत असल्याचे सांगितले. द्रविड म्हणाला,''कुणीतही या माणसाला या रुमबाहेर काढाल का?, अशा विचाराने हा खेळ बदनाम होतोय.''