Join us  

हैदराबादसाठी घसरगुंडी काही नवीन विषय नाही; अखेरच्या पाच षटकात आठ गडी गमावणारा संघ फक्त हैदराबादचाच

ही घसरगुंडी अविश्वसनीय वाटत असली तरी सनरायजर्ससाठी ही काही नवी गोष्ट नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 12:28 PM

Open in App

- ललित झांबरे 

आयपीएलमधील(IPL) रविवारच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) घसरगुंडी चर्चाच चर्चा आहे. रॉयल चॕलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) ने सामना जिंकण्यापेक्षा सनरायजर्सनी त्यांना विजय बहाल केला असे लोक म्हणत आहेत. 15.1 षटकात 2 बाद 121 वरुन 19.4 षटकात 153 धावात ते गुंडाळले गेले म्हणजे 27 चेंडूत 32 धावात 8 गडी हैदराबादने गमावले. 

16 व्या षटकात दोन (बेयरस्टो व शंकर), 17 व्या षटकात दोन (प्रियम गर्ग व अभिषेक शर्मा), 18 व्या षटकात पुन्हा दोन (राशिद खान व भुवनेश्वर कुमार) आणि पुढच्या दोन षटकात मिचेल मार्श व संदीप शर्मा यांना त्यांनी गमावले. 

ही घसरगुंडी अविश्वसनीय वाटत असली तरी सनरायजर्ससाठी ही काही नवी गोष्ट नाही. याच्याआधीही यापेक्षाही मोठी घसरगुंडी ते खेळले आहेत आणि तेसुध्दा फार दिवसांपूर्वी नाही तर गेल्याच वर्षी..

14 एप्रिल 2019 रोजी दिल्ली कॕपिटल्सविरुध्द हैदराबादला 155 धावांचा पाठलाग करताना त्यांचा डाव असाच 2 बाद 101 वरुन 116 धावांत आटोपला होता. त्यावेळी त्यांनी शेवटचे आठ गडी 22 चेंडूत आणि फक्त 15 धावात गमावले होते. यावेळी 27 चेंडूत आणि 32 धावात गमावले. 

योगायोगाची बाब म्हणजे दोन्ही वेळा घसरगुंडीची सुरुवात 16 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूपासूनच झाली होती. त्यावेळी त्यांनी 16 व्या षटकात एक, 17 व्या षटकात तीन आणि 19 व्या षटकात शेवटचे दोन गडी गमावले होते. 

आयपीएलच्या इतिहासात कुण्या संघाने अखेरच्या पाच षटकात आठ गडी गमावण्याचे हेच दोन प्रसंग आहेत आणि दुर्देवाने दोन्ही वेळा हे गडी गमावणारा संघ हैदराबादचाच आहे. 

त्याच्याआधी 21 मे 2011 रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबने  धर्मशाळा येथे डेक्कन चार्जर्सविरुध्द  33 धावातच 8 गडी गमावले होते. त्यावेळी पंजाबचा डाव 198 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 83 वरुन 116 धावात आटोपला होता.  39 चेंडूत त्यांनी हे गडी गमावले होते. 

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबाद