मुंबई : सचिन तेंडुलकर, क्रिकेट जगतातील एक महान क्रिकेटपटू. ज्याचा आदर्श जवळपास प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या डोळ्यापुढे ठेवतो. अनेकांच्या गळ्यातील ताईत, तर काहींसाठी तर तो देव. सचिन क्रिकेट विश्वात जास्त प्रसिद्ध झाला तो एक सलामीवीर म्हणून. पण सचिन कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सलामीला येत नव्हता. आजच्या दिवशीच 1994 साली सचिनने सलामीला यायला सुरुवात केली आणि त्याच्या प्रतिभेला क्रिकेट जगताने कुर्निसात केला.
भारतीय संघ 1994 साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू हा जायबंदी झाला होता. या दौऱ्यातील पहिला सामना भारताने गमावला होता. त्यामुळे संघाच्या समस्येत भर पडली होती. कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन आणि संघ व्यवस्थापक अजित वाडेकर यांना काय करावे, हे सुचत नव्हते. आपला संघ अडचणीत आहे, हे सचिनला समजले होते. न्यूझीलंडमधील खेळपट्टी गोलंदाजांसाठी कुरण असते, त्यांच्या माऱ्यापुढे सलामीवीर जास्त काळ टिकत नाहीत, हे त्याला माहिती होते. पण तरीही संघासाठी त्याने हे आव्हान स्वीकारले. चिंतेत असलेल्या वाडेकर यांच्याकडे सचिन गेला आणि म्हणाला, " संघाची सलामीची समस्या मी सोडवतो. कोणत्याही फलंदाजाला बाद होण्यासाठी फक्त एकच चेंडू पुरेसा असतो. त्यामुळे सलामीला जाण्यासाठी मी तयार आहे. "
सचिनचे हे बोल ऐकून वाडेकर सुखावले, पण त्यांना सचिनच्या कामगिरीची चिंता वाटत होती. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला 142 धावाच करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सचिन आणि अजय जडेजा यांनी 61 धावांची सलामी दिली, यामध्ये जडेजाच्या होत्या फक्त 18 धावा. जडेजा बाद झाल्यावरही सचिनने आपली धडाकेबाज फलंदाजी सुरूच ठेवली. या खेळीत सचिनने 49 चेंडूंत 82 धावांची खेळी साकारली, यामध्ये 15 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सचिनच्या या खेळीमुळे भारताने न्यूझीलंडवर सात विकेट्स राखून सहज विजय मिळवला होता. या सामन्यानंतर सचिनने सातत्यपूर्ण फलंदाजी केली आणि क्रिकेट जगताला एक महान सलामीवीर पाहता आला.