अनुभवी फलंदाज सुरेश रैनाला देशांतर्गत स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी संघात संधी देण्यात आली. मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्यानं उत्कृष्ट कामगिरी करत क्रिडाप्रेमींची मने जिंकली खरी पण त्याची खरी कसोटी पुढील काही दिवसांच्या सामन्यात असणार आहे. तीन सामन्यात 89 धावा करताना त्यानं एक गडी बाद केला. त्याचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार होतं. स्थानिक सामन्यामध्ये सुरेश रैनाची बॅट तळपली अन् भारतीय संघातील दरवाजे उघडले होते.
या डावखु-या फलंदाजाने याआधीचा आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडविरुद्ध फेब्रुवारी 2017 मध्ये टी 20 सामन्याच्या रूपाने खेळला होता. त्यानंतर फिटनेसच्या कारणामुळे तो संघाबाहेर होता. बंधनकारक असणा-या यो यो टेस्टमध्ये यशस्वी झाल्याने त्याचे पुनरागमन शक्य झाले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे हे रैनासाठी नुकत्याच झालेल्या मालिकेत जमेची बाजू होती. कर्णधार विराट कोहलीनं स्वत: चौथ्या स्थानावर फलंदाजीला येत रैनाला ही संधी दिली. रैनानं मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
2019 मध्ये होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्याचे ध्येय सुरेश रैनाचे आहे. त्यानं ते एका मुलाखतीत बोलूनही दाखवले. विश्वचषकात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. तसेच रैनाचे आहे. 2011-12 च्या विश्वविजेत्या संघाचा रैना सदस्य होता. त्यामुळं त्याच्याकडे मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. पण तो आगामी काही दिवसांमध्ये कसा खेळ करतो, यावर त्याचे विश्वचषकातील स्थान पक्के होईल. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये खेळाडू उत्कृष्ठ कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधत आहेत. त्यामुळं त्याला फिटनेससह आपल्या प्रतिस्पर्धी खेळडूंच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावं लागणार आहे.
क्रिकेटमध्ये बॅडपॅच येतोच, त्याला कोणीही चकवा देऊ शकले नाही. सुनील गावसकर पासून ते युवराज पर्यंत प्रत्येक खेळाडून बॅडपॅचमधून यशस्वी पुनरागमन केलं आहे. गेली दोन वर्ष रैनासाठी खराब होती तर वावग वाटायला नको. यातून धडा घेत रैनानं यशस्वी पुनरागमन केलं आहे. यापुढेही रैनाला संघात स्थान कायम टिकवायचे असेल तर मैदान गाजवल्याशिवाय पर्याय नाही.
पुनरागमन करताना चांगली कामगिरी होणे महत्त्वाचे आहे. रैनाने नुकत्याच झालेल्या सामन्यात ती चांगल्या प्रकारे केली. यानंतर श्रीलंका दौरा असून त्यानंतर आयपीएलमध्ये खेळणार आहे. पुढचे वर्षभर भारतीय संघाला बरेच सामने खेळायचे आहेत. सध्या भारतीय वन-डे संघाचा विचार केल्यास मधल्या फळीतील खेळाडूंच्या कामगिरीत सातत्या दिसून येत नाही. आघाडीचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्यास भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरत असल्याचे आपण बऱ्याच वेळात पाहिले आहे. वन-डेमध्ये रैनानं पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे. पण यापूर्वी अखेरचा वन-डे आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर 2015 मध्ये मुंबई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. पण या दोन वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेलं आहे. त्यामुळं विश्वचषक खेळाणाऱ्या भारताच्या संघात स्थान पटकावायचे असल्यास इथून पुढे त्याला मैदान गाजवावेच लागेल