नवी दिल्ली, दि. 14 - श्रीलंकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्या भवितव्याबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना भारतीय संघात जागा मिळवण्याची अद्यापही संधी आहे. पण तंदुरुस्ती आणि क्षेत्ररक्षणातील चपळता पाहूनच त्यांचा विचार केला जाईल, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतमध्ये शास्त्रींनी स्पष्ट केलं.
या मुलाखतीमध्ये शास्त्री म्हणाले, कोणत्याही खेळाडूला संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला मैदानात चांगली कामगिरी करावी लागेल. याशिवाय, क्षेत्ररक्षण आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. आगामी विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघ बांधणी करण्याचे काम निवड समिती करत आहे.
कोणतीही खेळाडू निवडण्यासाठी पात्र आहे जर तो फिटनेस, चालू फॉर्म आणि क्षेत्ररक्षण या गोष्टीत सक्षम असेल . संघाला सातत्याने विजय मिळवायचा असल्यास क्षेत्ररक्षणाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मी निवड प्रक्रियेत सहभागी नाही पण युवराज सिंग व सुरेश रैना यांच्यासाठी संघाचे दार बंद नाही. या तीन विभागात चांगले प्रदर्शन करणारा कोणताही खेळाडू निवडीसाठी पात्र आहे. रोटेशन पोलीसीबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करता, आम्ही प्रत्येक खेळाडूला श्रीलंकेत खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका विश्वचषक स्पर्धेसाठी कोर संघ तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
श्रीलंकेच्या मालिकेपूर्वी एनसीए बेंगळुरू येथे सुरेश रैना आणि युवराज सिंग हे दोघेही यो-यो चाचणीत फेल झाले होते. या चाचणीत भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूची सरासरी गुण 19.5 च्या वर आहे, ज्यात सर्वात वर मनिष पांडे व विराट कोहली आहेत. युवराज व रैना दोघांनीही या चाचणीत सरासरीपेक्षा ही कमी गुण मिळवले आहेत.
सुरेश रैनाने आपला शेवटचा वनडे सामना 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता, त्यानंतर तो आतापर्यंत संघाबाहेरच आहे. त्यानंतर त्याला फक्त टी -20 साठीच भारतीय संघात निवडले गेले होते. यावर्षीच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-20 वेळी तो भारतीय संघात होता. दुसऱ्या बाजूला युवराज सिंगने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात पुनरागमन केले होते. त्या मालिकेतील कट्टकच्या सामन्यात त्याने 175 धावा केल्या होत्या पण त्यानंतर त्याच्या फॉर्ममध्ये चढ उतार आले. युवराजची वनडेमधील मागील चांगली कामगिरी म्हणजे पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अर्धशतक.
'धोनीला संघातून बाहेर करण्याचा विचारही नाही करू शकत'
हेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघातील स्थानाबाबत अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केले जात आहेत.संघाचे मुख्य निवडकर्ता एम.एस.के.प्रसाद यांनीही धोनीच्या संघातील समावेशाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री प्रसाद यांच्या मताशी सहमत नाहीत. धोनीचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला संघातून बाहेर करण्याचा विचारही संघ व्यवस्थापन करू शकत नाही असं शास्त्री म्हणाले आहेत. श्रीलंका दौ-यात धोनीने शानदार प्रदर्शन करताना 82.23 च्या स्ट्राईक रेटने 162 धावा केल्या होत्या. या संपूर्ण मालिकेत धोनीला बाद करण्यात लंकेच्या गोलंदाजाना अपयश आलं होतं. या दौ-यात 100 स्टंपिंग करणाराही धोनी पहिला विकेटकिपर बनला. धोनीकडे फिटनेस आणि फॉर्म या दोन्ही गोष्टी आहेत, 2019 च्या विश्वचषकासाठी त्याची गरज आहे असं इंडिया टीव्हीसोबत बोलताना शास्त्री म्हणाले.यावेळी बोलताना त्यांनी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि ऑलराउंडर कपिल देव यांच्यासोबत धोनीची तुलना करताना त्याने मिळवलेल्या यशाचा सन्मान करायला हवा असं म्हटलं.
Web Title: Only then Yuvraj, Raina's place in the team - Ravi Shastri made clear
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.