नवी दिल्ली : ‘इंग्लंड दौऱ्याआधी संघात निवड झालेल्यांपैकी कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला संघाबाहेर केले जाईल,’ या कठोर शब्दांत बीसीसीआयने खेळाडूंना निर्देश दिले. भारतीय संघाचे फिजिओ योगेश परमान यांनी सर्व खेळाडूंना मुंबईत क्वाॅरंटाइन होण्याआधी स्वत:ला जपा, असा सल्ला दिला आहे. भारतीय संघातील सर्वच खेळाडू मुंबईत १९ मे रोजी बायोबबलमध्ये प्रवेश करतील. २ जून रोजी इंग्लंडकडे रवाना झाल्यानंतर येथे दहा दिवस क्वाॅरंटाइन रहावे लागणार आहे.
बायोबबलमध्ये प्रवेश केल्यानंतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबीयांची कोरोना चाचणी केली जाईल. दौऱ्यावर जाणारे २० खेळाडू देशातील विविध राज्यांचे असल्याने बीसीसीआय खेळाडूंसाठी विशेष बायोबबल तयार करणार आहे.
बोर्डाने सर्वच खेळाडूंना कोरोनामुक्त राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आले तरी त्या खेळाडूंसाठी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था करण्यात येणार नाही. आयपीएलदरम्यान काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बीसीसीआय आधीच्या तुलनेत आता अधिक सावधतेने काम करीत आहे.
दोन चाचण्या निगेटिव्ह हव्या
बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाच्या दोन चाचण्या घेतल्या जातील. या दोन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह येणे आवश्यक असेल. यामुळे बबलमध्ये कुणा बाधित झालेल्या व्यक्तीचा प्रवेश होणार नाही, याची खात्री बाळगली जाईल. बोर्डाने खेळाडूंना घरून मुंबईत येताना खासगी वाहन किंवा विमानाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
केवळ कोविशिल्ड लस घ्या!
इंग्लंड दौरा करणाऱ्या खेळाडूंना बोर्डाने केवळ कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. लसीच्या दुसऱ्या डोसबाबत बीसीसीआय इंग्लंड बोर्डाच्या संपर्कात आहे. खरे तर इंग्लंडमध्ये ॲस्ट्राझेनेका लस उपलब्ध आहे. ही लस कोविशिल्डशी मिळतीजुळती असल्याने इंग्लंड दौऱ्यात सर्व खेळाडूंना ॲस्ट्राजेनेकाचा डोस देण्याची बोर्डाची योजना आहे.
या खेळाडूंनी घेतली लस!
विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा , जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनी लसीचा पहिला डोस घेतला. एखाद्या शहरात लस उपलब्ध नसेल तर खेळाडूंनी बोर्डाला कळवावे. बोर्ड त्यांच्यासाठी लस उपलब्ध करून देईल,’ असेही बोर्डाने कळविले आहे.
Web Title: Only those who are free from corona will tour England says BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.