ICC Rankings : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पण, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांची कामगिरी दणदणीत राहिली. आज आयसीसीने जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याने फलंदाजांमध्ये आपली मक्तेदारी कायम राखताना अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडच्या खेळाडूंनी मात्र फलंदाजी, गोलंदाजी व अष्टपैलू या क्रमवारीत गगन भरारी घेतली आहे. सूर्याने दबदबा राखला असला तरी त्याच्यासह भारताचे दोनच खेळाडू टॉप टेन मध्ये दिसत आहेत.
सूर्यकुमारने सुपर १२मध्ये पाच सामन्यांत तीन अर्धशतकं झळकावली. त्याने कारकीर्दितील सर्वोत्तम ८६९ रेटींग पॉईंटसह अव्वल स्थान पटकावले होते, परंतु इंग्लंडविरुद्ध फायनलमध्ये तो १४ धावांवर बाद झाला. त्याचा त्याच्या रेटींग पॉईंट्समध्ये १० गुणांचा फटका बसला. सूर्याने वर्ल्ड कपमध्ये ५९.७५च्या सरासरीने २३९ धावा केल्या आणि तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला. इंग्लंडचा सलामीवीर ॲलेक्स हेल्स याने उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ४७ चेंडूंत नाबाद ८६ धावा चोपल्या. त्याने आयसीसी क्रमवारीत २२ स्थानांची झेप घेत १२वा क्रमांक पटकावला. हेल्स या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा ( २१२ धावा) फलंदाज ठरला. हेल्सने २०२२मध्ये ट्वेंटी-२०त ४३० धावा केल्या आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि रिली रोसोवू यांनीही त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराने उपांत्य फेरीत अर्धशतक झळकावले आणि तो पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रोसोवू सातव्या क्रमांकावर आला आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आठव्या क्रमांकावर सरकला आहे. रोसोवूने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली. सुर्या व बाबर यांच्यासह मोहम्मद रिझवान, डेव्हॉन कॉनवे व एडन मार्कराम हे टॉप पाच फलंदाज आहेत. रिझवान व मार्कराम यांनी अनुक्रमे दुसरे व पाचवे स्थान टिकवले आहे. कॉनवे चौथ्या स्थानी सरकला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"