मुंबई : भारतीय संघाचा माजी तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. कॅनडा ट्वेंटी-20 लीगमध्ये युवीची बॅट हवी तशी तळपली नाही. त्यामुळे चाहते निराश झाले. पण, आजचा दिवस हा युवीचा आहे. 19 सप्टेंबर 2007, म्हणजेच 12 वर्षांपूर्वी युवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा पराक्रम केला होता. त्याच्या या फटकेबाजीनं इंग्लंडच्या सध्याच्या महान गोलंदाजावर 12 वर्षांपूर्वी तोंड लपवण्याची वेळ आली होती.
2007च्या आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी गटातील तो सामना होता. त्या सामन्यात युवीनं इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता. या स्पर्धेतील तो 21वा सामना होता आणि डर्बन येथे तो खेळवण्यात आला होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. विरेंद्र सेहवाग (68) आणि गौतम गंभीर (58) यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली होती.
या सामन्याच्या 19व्या षटकात इतिहास घडला. मैदानावर येत असताना इंग्लंडच्या अँड्य्रु फ्लिंटॉफनं युवीला डिवचले आणि त्याचा फटका ब्रॉडला बसला. 19व्या षटकात युवीनं खणखणीत सहा षटकार खेचले. या सामन्यात युवीनं 12 चेंडूत अर्धशतक झळकावले. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ते सर्वात जलद अर्धशतक ठरले. युवीनं 16 चेंडूंत 3 चौकार व 7 षटकार खेचून 58 धावांची खेळी केली आणि संघाला 218 धावांचा पल्ला गाठून दिला.