क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्च्या.... आदी अनेक नावांनी आपण ज्याला ओळख होतो, ओळखतो आणि पुढेही हीच नावं आपल्याला सचिन तेंडुलकरच्या अगदी जवळ नेणारी... त्यामुळेच तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर इतक्या वर्षांनीही त्याची ती फलंदाजीतील नजाकत आपल्या डोळ्यासमोर ताजी वाटते. २०१२ साली आजच्याच दिवशी आशिया चषक स्पर्धेतील वन डे सामना तेंडुलकरच्या कारकिर्दीतील अखेरचा ठरला. मायदेशात परतल्यानंतर तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा तडकाफडकी निर्णय बीसीसीआयला मेलद्वारे कळवला. एकीकडे तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असतान दुसरीकडे क्रिकेटच्या देवाच्या त्या अखेरच्या सामन्यातूनच टीम इंडियाला नवा स्टार मिळाला... १८ मार्च २०१२, आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी ढाका सज्ज होते. दोन दिवसांपूर्वी याच मैदानावर तेंडुलकरनं महा शतक साजरे केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक करणारा तो जगातील पहिला आणि आतापर्यंत तरी एकमेव फलंदाज आहे. त्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानविरुद्धचा सामना तेंडुलकरच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल असे कुणाच्या ध्यानी मनीही वाटले नव्हते. १६ नोव्हेंबर २०१३ मध्ये तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे ढाका येथे झालेला वन डे सामना तेंडुलकरचा अखेरचा सामना ठरला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३२९ धावांचा डोंगर उभा केला. मोहम्मद हाफीज ( १०५) आणि नासीर जमशेद ( ११२) या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना हतबल केले. त्यात यूनीस खाननं ५२ धावांची आक्रमक खेळी करून टीम इंडियासमोर ३३० धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना गौतम गंभीर ( ०) भोपळा न फोडताच माघारी परतला. तेंडुलकरने युवा फलंदाज विराट कोहलीसह टीम इंडियाचा डाव सावरला. तेंडुलकर ५२ धावा करून माघारी परतला. पण, कोहली आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रोहित ६८ धावांवर बाद झाल्यानंतर कोहलीनं कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली. त्यानं १४८ चेंडूंत २२ चौकार व १ षटकार खेचून १८३ धावा चोपल्या. त्याच्या या खेळीनं टीम इंडियाला ६ विकेट्स व १३ धावांनी विजय मिळवून दिला.
एकीकडे सचिन तेंडुलकरचा तो अखेरचा सामना ठरत असताना टीम इंडियाला विराटच्या रुपानं नवा स्टार मिळाल्याची चर्चा तेव्हा सुरू झाली. विराटनं त्याच्या कामगिरीनं ती चर्चा खरी ठरवली आहे. १८ ऑगस्ट २००८ मध्ये विराटनं पहिला वन डे सामना खेळला होता, पण २०१२मधील या खेळीनं त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. तेंडुलकरनं ४६३ वन डे सामन्यांत १८४२६ धावा केल्या. वन डे क्रिकटेमध्ये त्याच्या नावावर असलेले विक्रम आजही कोणी मोडू शकलेला नाहीत. सर्वाधिक सामने - ४६३सर्वाधिक धावा - १८४२६सर्वाधिक शतकं - ४९ सर्वाधिक अर्धशतक - ९६सर्वाधिक चौकार - २०१६सर्वाधिक १००+ भागीदारी - ९९