लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीनं क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या संघांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बुधवारी छोटेखानी उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात सर्व संघांच्या कर्णधारांचे जंगी स्वागत करण्यात आले आणि प्रत्येक संघाला 60 सेकंदाचे चॅलेंजही देण्यात आले. त्यात भारताला 10व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यांमध्ये आतापर्यंत 59 सामने खेळवले गेले आहेत. यापैकी 29 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत, तर इंग्लंडला 26 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहेत. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक सामना बरोबरीत सुटला आहे, तर तीन सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाने दोन सराव सामने खेळले. पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. पण, दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 95 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लोकेश राहुल व महेंद्रसिंग धोनी यांनी शतकी खेळी साकारली. राहुलच्या शतकाने भारताच्या चौथ्या क्रमांकाचा तिढा सोडवला आहे.
भारतीय संघ वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पाहत आहे, परंतु मुख्य स्पर्धेपूर्वी देण्यात आलेल्या 60 सेकंद चॅलेंजमध्ये भारताच्या चमूला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यजमान इंग्लंडने अव्वल,तर ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान पटकावले. काय होतं हे 60 सेकंद चॅलेंज? आणि कोणी कशी मारली बाजी? पाहा व्हिडीओ..