गुणतालिकेत तळाच्या स्थानी असलेल्या दोन संघांना आगेकूच करण्याची संधी आहे, पण त्यामुळे प्ले आॅफसाठी पात्र ठरण्यासाठी मोठी मदत होण्याची शक्यता नाही. आरसीबी संघ गुणांचे खाते उघडण्यासाठी उत्सुक आहे, तर राजस्थान रॉयल्स संघ एका स्थानाने आगेकूच करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
चेन्नईविरुद्ध अखेरच्या चेंडूवर पराभव स्वीकारणाऱ्या राजस्थान संघाला आता मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मुंबई संघाला आता सूर गवसला असून पोलार्डला फॉर्म सापडल्यामुळे त्यांना आता रोखणे सोपे नाही. त्यांना गोलंदाजीमध्ये समतोल साधण्यात यश मिळाले असून हार्दिक पांड्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे त्यांची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.राजस्थान रॉयल्स संघाला भारतीय खेळाडूंकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यात संजू सॅम्सनने एका लढतीत शतकी खेळी केली होती तर लेग स्पिनर श्रेयस गोपालने अंतिम ११ मधील आपले स्थान निश्चित केले आहे. हा संघ बºयाच अंशी बटलर, स्मिथ आणि आर्चर यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्यांना बेन स्टोक्सची साथ मिळाली तर संघावरील दडपण बरेच कमी होईल.
युझवेंद्र चहलचा अपवाद वगळता आरसीबीला दर्जेदार गोलंदाजांची उणीव भासत आहे. त्यांना २०० पेक्षा अधिक धावसंख्येचाही बचाव करता आलेला नाही. आंद्रे रसेलच्या आक्रमक खेळीमुळे त्यांना केकेआरविरुद्ध विशाल धावसंख्येचा बचाव करता आला नव्हता. आरसीबीची फलंदाजीची बाजू मजबूत भासते. दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली व डिव्हिलियर्स यांच्या समावेशामुळे त्यांची फलंदाजीची मजबूत आहे, पण हे दोघे अपयशी ठरल्यानंतर मात्र अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मोईन अली टप्प्याटप्प्याने चांगली कामगिरी करीत आहे, पण त्यांनी शिमरोन हेटमेयरला संधी द्यायला हवी. वेस्ट इंडिजच्या अन्य खेळाडूंप्रमाणे हा खेळाडूसुद्धा छाप सोडण्यात यशस्वी ठरू शकतो. अन्य आक्रमक खेळाडू शिवम दुबेलाही संधी मिळायला हवी.पंजाबची स्पर्धेतील वाटचाल चांगली आहे. मुंबईविरुद्ध अखेरच्या चेंडूवर पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ते निराश झाले असतील. लोकेश राहुलने फलंदाजीत संघाचा भार सांभाळला आहे. ख्रिस गेल षटकारांची आतषबाजी करीत संघाला चांगली सुरुवात करुन देत आहे. गोलंदाजीमध्येही संघाने समतोल साधला आहे.