नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १४ वे पर्व पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. ३१ सामन्यांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला कात्री लावता येईल का,यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची मनधरणी करण्यात येत आहे. आयोजनासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत बीसीसीआयला २० दिवसांच्या ‘विंडो’ची गरज असेल. आयपीएल सामन्यांसाठी भारताबाहेरील इंग्लंड हा उत्कृष्ट पर्याय असल्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध चार ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामने कमी करण्याच्या पर्यायावर बीसीसीआय गांभीर्याने विचार करीत आहे.
‘आयपीएल’ची प्रक्षेपण वाहिनी स्टार स्पोर्ट्सनेसुद्धा याबाबत अनुकूलता दर्शवली. ईसीबीने कसोटी सामन्यांच्या वेळापत्रकात कपात करण्याचे मान्य केले तरी त्यांना आयपीएलचा आयोजक बनविण्याची बीसीसीआयची तयारी हवी. यामुळे त्यांच्या कौंटी संघांना नफा होईल. दुसरीकडे आयपीएलसाठी विंडो उपलब्ध होईल शिवाय सर्व देशांचे खेळाडू सहभागी होऊ शकतील. टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारतात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्या पासून होऊ शकेल.
आयपीएलसाठी इंग्लंड का?
भारतीय संघ पुढील काही महिने इंग्लंडमध्ये असल्याने क्वारंटाइन नियम खेळाडूंच्या अंगवळणी पडलेले असतील. अन्य देशांचे खेळाडू सहजपणे इंग्लंडमध्ये येऊ शकतील. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये केवळ तीन दिवस क्वारंटाइनचा नियम आहे. येथे कोरोना नियंत्रणात आहे. मिडलसेक्स, सरे, वाॅर्विकशायर आणि लंकाशायर या कौंटींनी आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव दिला आहे. इंग्लंडमध्ये आयपीएल सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश दिल्यास पर्यटनाला चालना मिळेल शिवाय आयोजक, प्रायोजक, फ्रॅन्चायजी आणि खेळाडूंना लाभ होईल.
Web Title: Organizing the remaining matches of the IPL in September at England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.