कोलकाता : वेगवान गोलंदाजीचा शानदार नमुना सादर करणा-या श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने आज येथे भारताविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बळी घेतले. तो कसोटी डावात एकही धाव न देता ३ बळी घेणारा केवळ दुसराच गोलंदाज ठरला आहे.
पावसाचा व्यत्यय आलेल्या पहिल्या दिवशी भारताने ३ बाद १७ धावा केल्या.
या दरम्यान लकमलने सर्वच सहा षटके निर्धाव टाकताना ३ गडी बाद केले. त्याच्याआधी एकही धाव न देता ३ बळी घेण्याची कामगिरी आॅस्ट्रेलियाच्या रिची बेनो याने भारताविरुद्ध दिल्लीच्या फिरोजशाह कोटलाच्या मैदानावर केली होती. तेव्हा त्याने ३.४ षटकांत एकही धाव न देता ३ बळी घेतले होते. तसेच यजमान भारताला १३५ धावांत गुंडाळण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
लकमल याने आज सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर लोकेश राहुल (०) याला तंबूत धाडले. त्याने दुस-यांदा पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. याआधी त्याने २०१० डिसेंबरमध्ये कँडी येथे वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले होते. तो कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा श्रीलंकेचा एकमेव गोलंदाज आहे. राहुल कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा भारताचा सहावा फलंदाज आहे.
याआधी सुनील गावस्कर (३ वेळा), सुधीर नाईक, वूरकेरी रमन, शिवसुंदर दास आणि वसीम जाफर हे पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत. राहुलप्रमाणेच कर्णधार विराट कोहली यालादेखील लकमल याने भोपळा फोडू न देता तंबूत धाडले. कोहली सहाव्यांदा कसोटीत भोपळा फोडू शकला नाही. कोहली गेल्या ११ डावांत फक्त एकदाच ५० धावांचा आकडा पार करू शकला आहे. तेव्हा त्याने जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध गॅली येथील कसोटीत नाबाद १०३ धावांची खेळी केली होती.
Web Title: The other bowler, who took three wickets without any runs, scored another ball
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.