पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी पुन्हा एकदा भारताला धमकावले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या एका वक्तव्याला प्रत्यूत्तर देताना त्यांनी भारताला आमच्याशिवाय वर्ल्डकप खेळावा लागेल, असे म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून संबंध बिघडले आहेत. दहशतवादावरून भारताने पाकिस्तानमध्ये आपला संघ पाठविण्यास नकार दिलेला आहे. भारतासोबत सामने झाले तर पाकिस्तानला कमाई होते, यामुळे पाकिस्तान भारतासोबत खेळण्यासाठी उताविळ झाला आहे. आशिया आणि वर्ल्डकप स्पर्धेतच पाकिस्तानला ही संधी मिळते.
२०१२ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाहीय. तर टीम इंडिया गेल्या १४ वर्षांपासून पाकिस्तानात गेलेली नाही. २००८ मध्ये आशिया कप खेळण्यासाठी भारतीय टीम अखेरची पाकिस्तानात गेली होती. आता पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आशिया कप होणार आहे. यावर जय शाह यांनी नुकतेच भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचे म्हटले होते. यामुळे पाकिस्तानींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
रमीझ राजा यांनी थयथयाट सुरु केला असून जर भारत पाकिस्तानात आला नाही तर पुढील वर्षी होणाऱ्या भारतातील वर्ल्डकपसाठी पाकिस्तान येणार नाही, अशी धमकीच देऊन टाकली आहे. जर पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये खेळला नाही तर टुर्नामेंटच कोण पाहणार आहे? यामुळे भारताने पाकिस्तानात यावे, तरच पाकिस्तान भारतात जाईल, असे आम्हाला स्पष्टपणे म्हणायचे आहे, असे राजा म्हणाले.
पाकिस्तान क्रिकेटला आर्थिक परिस्थिती सुधरविण्याची गरज आहे. जेव्हा आम्ही चांगले प्रदर्शन करू तेव्हाच हे शक्य आहे. आमच्या संघाने चांगलीच कामगिरी केली आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये आणि आशिया कपमध्ये आम्ही भारताला हरविले आहे. अब्जाधीश असलेल्या भारतीय संघाला आम्ही एकाच वर्षात दोनदा मात दिली आहे, असेही राजा म्हणाले.