आमचे धडधडणारे हृदय...  मुंबईचे कर्णधारपद भूषविणे माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात मी ८७ धावांची खेळी केली. गेल्या वर्षी याच स्टेडियममध्ये मुंबईचा कर्णधार म्हणून मी रणजी चषक उंचावला होता. जवळपास आठ वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईने रणजी चषक जिंकला होता. अशा अनेक आठवणी कायम मनात घर करतात. येथे मी अनेक सामने खेळलो; पण या दोन आठवणी माझ्यासाठी खूप विशेष आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 11:34 IST2025-01-19T11:34:02+5:302025-01-19T11:34:20+5:30

whatsapp join usJoin us
Our beating heart... It is a great honour for me to captain Mumbai. | आमचे धडधडणारे हृदय...  मुंबईचे कर्णधारपद भूषविणे माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब 

आमचे धडधडणारे हृदय...  मुंबईचे कर्णधारपद भूषविणे माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अजिंक्य रहाणे  
(मुंबई रणजी संघ कर्णधार)

मुंबईची शान असलेल्या वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण होत असून, हा खूप मोठा क्षण आहे. एक क्रिकेटपटू म्हणून माझ्यासारख्या अनेक खेळाडूंसाठी ही अभिमानाची बाब आहे. त्याचवेळी, चाहत्यांसाठीही ही गौरवाची बाब आहे. अनेक आठवणी या स्टेडियमशी जुळलेल्या आहेत. लहान असल्यापासून मला येथे खेळण्याची संधी मिळाली आणि यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानतो. या स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

केवळ खेळाडूच नाही, तर सामान्य मुंबईकरांसाठीही हे स्टेडियम विशेष ठरले आहे. प्रत्येकाचे या स्टेडियमशी एक भावनिक नाते आहे. या स्टेडियममध्ये मिळणारे वातावरण (व्हाइब) भन्नाट असते. प्रचंड गर्दीत जेव्हा स्टेडियममध्ये आपण प्रवेश करतो, तेव्हा अंगावर काटे येतात. या स्टेडियममध्ये एक सकारात्मक ऊर्जा आहे. कोणत्याही सामन्यादरम्यान येथे वेगळीच ऊर्जा अनुभवण्यास मिळते.  
वानखेडे स्टेडियमची भौगोलिक रचना इतर स्टेडियम्सच्या तुलनेत खूप वेगळी आणि सहजसोपी आहे. चर्चगेट स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असल्याने प्रवासाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी हे स्टेडियम अत्यंत सोयीचे ठरते.

लहानपणी लोकल ट्रेनने प्रवास करताना नेहमी हे स्टेडियम पाहायचो. तेव्हापासूनच येथे जाण्याचे आणि खेळण्याचे असे स्वप्न पाहिले. त्यावेळी जुने स्टेडियम होते. येथे खेळायला मिळणे याहून दुसरा आनंद कोणता नसेल; पण माझी इच्छा येथे केवळ एकदातरी इथे प्रवेश करण्याची होती. त्यामुळेच आज मी स्वत:ला खूप नशीबवान मानतो, कारण मला येथे खेळायला मिळालं. १४ वर्षांखालील वयोगटात खेळताना माझे हे स्वप्न साकार झाले होते. त्यावेळी झालेला आनंद कधीच विसरू शकणार नाही. येथे खेळण्याआधी मैदान क्रिकेट खेळलो होतो आणि प्रत्येक मैदानाची खेळपट्टी आणि स्टेडियमची खेळपट्टी यामध्ये खूप मोठा फरक होता. त्यात, मी जागतिक स्तराच्या खेळपट्टीवर खेळत होतो. एक फलंदाज म्हणून हा फरक लगेच जाणवला आणि त्यावेळी मिळालेली प्रेरणा माझ्यासाठी खूप मोलाची ठरली.

वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) केलेला मुंबईतील मैदान कर्मचाऱ्यांचा सत्कार विशेष क्षण ठरला. एका सामन्याच्या आयोजनामध्ये अनेकांचा हातभार असतो. यामध्ये मैदान कर्मचाऱ्यांची मेहनत खूप मोलाची ठरते. 
खेळपट्टीसह संपूर्ण मैदानाची निगा राखणे, हे सोपे काम नाही. एमसीएने त्यांच्यासाठी वैद्यकीय शिबिरही आयोजित केले होते. सर्वांचे लक्ष खेळाडू, संघ, खेळाडूंच्या सोयी-सुविधा याकडे असते; पण मैदान कर्मचाऱ्यांचा कोणी विचार करत नाही. एमसीएने त्यांचा विचार केला आणि त्यांच्या सत्कार समारंभात मलाही सहभागी होता आले. एक खेळाडू म्हणून प्रत्येक वेळी मला या सहकाऱ्यांकडून माहिती मिळत असते.

मुंबईचे कर्णधारपद भूषविणे माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. एक कर्णधार म्हणून तुम्ही कशाप्रकारे खेळाडू घडवता, हे सर्वात मोठे आव्हान असते, असे मला वाटते. प्रत्येक खेळाडूला कसा पाठिंबा देता येईल, त्याच्या कठीण काळात कशाप्रकारे त्याला मदत करता येईल, तसेच त्याच्या चांगल्या काळात त्याला कसे आणखी प्रोत्साहन देता येईल, याकडे माझे लक्ष असते. या स्टेडियमने माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना घडवले आहे. हे स्टेडियम आमच्यासाठी दुसरे घर आहे. येथे केवळ मुंबईच नाही, तर भारतीय क्रिकेटचा इतिहास आहे. मुंबईकरांच्या मनामध्ये विशेष स्थान असलेले या स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण होत असून, हा क्षण आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. 

(शब्दांकन : रोहित नाईक)

Web Title: Our beating heart... It is a great honour for me to captain Mumbai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.