सिडनी : भारतीय महिला क्रिकेट संघ टी-२० विश्वचषकातील सर्वांत मजबूत दावेदार संघांमध्ये नाही. मात्र, युवा खेळाडूंच्या उपस्थितीत हा संघ स्पर्धेतील सर्वांत आनंदी संघ नक्कीच आहे,’ असे भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने सांगितले. भारतीय संघाचे सरासरी वय २३ पेक्षा कमी आहे. मानधना म्हणाली की, फक्त स्पर्धेचा आनंद घेण्याची बाब आहे. याबाबतीत आम्हाला विश्वचषक स्पर्धेत पर्दापण करणारा थायलंड संघच फक्त आव्हान देऊ शकतो. तो मजा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे.
मानधना म्हणाली की, संघातील खेळाडूंना माहीत आहे की, त्यांना आनंद कसा मिळवायचा आहे. आम्ही खूप वेळा नाचतो, गाणी गातो, इतरही काही गोष्टी करत असतो. तिने सांगितले की, युवा खेळाडू खूपच निडर आहेत. त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. त्यांच्यामुळे इतरांचीही ऊर्जा वाढते. आमच्या संघाचे सरासरी वय पाहिले तर तुम्हाला कळेल की या युवा संघाला मजेतच राहिले पाहिजे. मागील दोन वर्षांपासून अशी स्थिती आहे. यापूर्वी असे नव्हते असे नाही. मात्र, युवा खेळाडूंच्या समावेशामुळे संघात चैतन्य सळसळत आहे. या कूल संघात जेमिमा रॉड्रिग्स सर्वांत आघाडीवर आहे. ती एक चांगली गिटारीस्ट आहे. त्याचबरोबर ती खूप मस्ती करते. कधीकधी वाटते, ही भारतीय संघाची ड्रेसिंग रूम नाही तर डान्स फ्लोअर आहे.