पाकिस्तान संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८ व्या सामन्यांत हार पत्करावी लागली. भारताने पाकिस्तानी संघावर ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. पाकिस्तानचे १९१ धावांचे लक्ष्य भारताने ३०.३ षटकांत सहज पार केले. रोहित शर्माने ८६ धावांची वादळी खेळी केली, श्रेसय अय्यरने नाबाद ५३ धावा केल्या. या पराभवानंतर भारत आणि पाकिस्तानी क्रिकेटर्सं आपलं मत मांडत आहेत. त्यातच, बाबर आजम ( Babar Azam) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांच्यात फॅनबॉय क्षण पाहायला मिळाला. यावरही प्रतिक्रिया उमटत आहेत.
टीम इंडियाच्या अफलातून खेळीनंतर जगभरातून भारतीय संघाचं कौतुक करण्यात येत आहे. तर, भारतच यंदाच्या विश्वचषकाचा दावेदार मानला जात आहे. पाकिस्तानी खेळाडूंवर काही प्रमाणात टीका होत असताना पाकिस्तानचे माजी खेळाडू त्यांच्या संघाचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. बुम बुम आफ्रिदी म्हणजे पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीने ट्विट करुन भारताचं अभिनंदन केलं आहे. मात्र, यावेळी, आमचा पाकिस्तानी संघ ग्रेट असल्याचे सांगत भारतीय संघाला टोमणाही मारला.
विजयानंतर भारत नंबर १
भारताने या विजयासह १.८२१ अशा नेट रन रेटसह अव्वल स्थानी झेप घेतली. पाकिस्तान -०.१३७ अशा नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. न्यूझीलंड ६ गुण व १.६०४ नेट रन रेटसह दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका २.३६० नेट रन रेट व ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर भारताचा स्टार फलंदाज विराटकडे गेला अन् त्याच्याकडे टीम इंडियाच्या जर्सीवर स्वाक्षरी मागितली. विराटनेही लगेच त्याची विनंती मान्य केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.