मेलबोर्न : सध्या क्रिकेटचा होणारा भडिमार चिंताजनक आहे. त्यामुळे चाहत्यांइतकाच मीसुद्धा निराश असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने व्यक्त केले आहे. यावर्षीचा ऑस्ट्रेलियन संघाचा क्रिकेट कार्यक्रम बघून हैराण झाल्याचेही वॉने मान्य केले.
कोरोनाच्या प्रकोपानंतर जागतिक आणि स्थानिक स्तरावर क्रिकेटने पुन्हा वेग घेतला आहे. तसेच आयपीएलच्या धरतीवर विविध देशांनी लीग क्रिकेट सुरू केल्याने सध्या अतिक्रिकेटचा भडिमार सुरू झालेला आहे. याच परिस्थितीवर स्टीव वॉने चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, ‘टी-२० विश्वचषक झाल्यानंतर लागलीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. मला वाटतं, या मालिकेची गरज नव्हती. कारण, चाहत्यांनासुद्धा अतिक्रिकेटचा कंटाळा आला होता. याची साक्ष रिकाम्या स्टेडियमने दिली. त्यामुळे क्रिकेट सामन्यांवर आवर घालण्याचा विचार आयसीसीने करायला हवा. निरर्थक क्रिकेट मालिकांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. हे जर असेच सुरू राहिले तर क्रिकेट पाहण्याचा चाहत्यांचा ओघ कमी होईल.’
प्रेक्षक आणि चाहते क्रिकेटचा आत्माचाहते आणि प्रेक्षकांना जर आपण असेच गृहीत धरत गेलो, तर एक दिवस ते या खेळाकडे नेहमीसाठी पाठ फिरवतील. शेवटी प्रेक्षक आणि चाहते कुठल्याही खेळाचा आत्मा असतात. त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडीचा आयसीसीने विचार करायला हवा.