विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'चे होणार निरीक्षण, होणार का नियमांमध्ये बदल...

एमसीसीने आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'चे निरीक्षण करण्याचे ठरवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 07:03 PM2019-08-13T19:03:31+5:302019-08-13T19:04:53+5:30

whatsapp join usJoin us
Overview of World Cup finals overthrow will be monitored by MCC | विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'चे होणार निरीक्षण, होणार का नियमांमध्ये बदल...

विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'चे होणार निरीक्षण, होणार का नियमांमध्ये बदल...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी विश्वचषक २०१९: नुकत्याच झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'ची जोरदार चर्चा झाली. इंग्लंडला विजयासाठी ३ चेंडूंत ९ धावांची गरज असताना त्यांना 'ओव्हर थ्रो'मुळे सहा धावा मिळाल्या आणि ते विजयासमीप पोहोचले होते. पण हा 'ओव्हर थ्रो'चा निर्णय योग्य होता की नाही, याची आता निरिक्षण करण्यात येणार आहे.

मेरिलिबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) क्रिकेटचे नियम बनवत असते. या एमसीसीने आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'चे निरीक्षण करण्याचे ठरवले आहे. या निरीक्षणांनंतर आता नियमांमध्ये बदल होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विश्वचषक अंतिम सामन्याचे लाखात एक असा अविस्मरणीय आणि अफलातून सामना असे वर्णन होत असले तरी या सामन्यात चौकार मोजण्याचा नियम आणि फलंदाजांला चेंडू लागून झालेल्या ओव्हर थ्रोच्या इंग्लंडला मिळालेल्या पाच ऐवजी सहा धावा यामुळे न्यूझीलंडवर अन्याय झाल्याची चर्चा होत आहे. या दोन चुकांनी विशेषत: ओव्हर थ्रोच्या धावा देतांना झालेल्या पंचाच्या चुकीने, तर न्यूझीलंडला विश्वविजेतेपदापासूनच वंचित ठेवल्याची भावना आहे. पंचांनी यावेळी सहा ऐवजी नियमानुसार पाचच धावा दिल्या असत्या तर सामना टाय होण्याचा प्रश्नच नव्हता, उलट न्यूझीलंडने एका धावेने सामना जिंकला असता असे माजी पंच व क्रिकेटचे जाणकार म्हणत आहेत.


इंग्लंडच्या डावातील शेवटून तिसऱ्या चेंडूवर हे ओव्हरथ्रो नाट्य घडले. ट्रेंट बोल्टचा तो चेंडू बेन स्टोक्सने डीप मिडविकेटकडे फटकावल्यावर मैदानातून खोलवरुन मार्टीन गुप्तीलने थ्रो केला पण धाव घेण्यासाठी धावणाºया आणि धावबाद होण्यापासून वाचण्यासाठी क्रीझकडे झेपावलेल्या स्टोक्सच्या बॅटीला चेंडू लागून त्याची दिशा बदलली आणि जो डायरेक्ट थ्रो होणार होता त्याऐवजी तो चेंडू थेट सीमापार झाला आणि या गोंधळात फलंदांजांनी काढलेल्या दोन धावा अधिक ओव्हर थ्रोच्या चार धावा अशा एकूण सहा धावा पंचांंनी इंग्लंडला बहाल केल्या पण मुळात हा निर्णय चुकीचा होता कारण गुप्टिलने ज्यावेळी चेंडू थ्रो केला त्यावेळी फलंदाज स्टोक्स व आदिल रशिद हे दुसरी धाव घेण्यासाठी फक्त वळले होते, त्यांनी एकमेकाला ओलांडलेले नव्हते त्यामुळे दुसरी धाव अवैध होती. या सहा धावा मिळाल्याने इंग्लंडचे लक्ष दोन चेंडूत तीनच धावा असे बदलले आणि त्यांनी पुढे हा सामना टाय केला आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टायच राहिल्यावर बाऊंडरी काउंटबॅक नियमाने इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळवून दिले.


क्रिकेटच्या नियम १९.८ नुसार ओव्हर थ्रो वेळी चौकाराशिवाय निघालेल्या धावा मिळतील, पण धाव पूर्ण झालेली पाहिजे आणि थ्रो करतेवेळी फलंदाजांनी एकमेकाला ओलांडलेले असले पाहिजे तरच ती धाव ग्राह्य धरण्यात येईल. मात्र प्रत्यक्षात स्टोक्स व रशिद हे गुप्टिलच्या थ्रो वेळी दुसरी धाव घेताना एकमेकांना ओलांडून गेलेलेच नव्हते. त्यामुळे पंच मरायस एरास्मस व कुमार धर्मसेना यांचा इंग्लंडला सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचाच होता हे आता स्पष्ट झाले आहे.
केवळ धावच नाही तर ही चूक वेळीच लक्षात आली असती तर पुढच्या चेंडूला स्ट्राईक रशिदकडे आली असती. पण तसेही घडले नाही.
माजी अनुभवी पंच सायमन टोफेल यांनी सहा धावांचा हा निर्णय चुकीचाच असल्याचेच म्हटले आहे. मात्र यात धाव घेणारे फलंदाज बघायचे की थ्रो करणारा क्षेत्ररक्षक एकाच वेळी बघायचा हे फार अवघड असते असे टोफेल यांनी म्हटले आहे. टोफेल यांनी १७४ वन डे, ७४ कसोटी आणि ३४ टी-२० आंतरराष्टÑीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. (वृत्तसंस्था)
>‘ओवरथ्रो’वर सहा धावा बहाल करण्याची झाली चूक
‘विश्वचषक अंतिम सामन्यात पंचांनी इंग्लंडला ‘ओवरथ्रो’साठी पाचऐवजी सहा धावा बहाल करण्याचा चुकीचा निर्णय घेतला,’ असे माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टॉफेल व के. हरिहरण यांनी सोमवारी म्हटले. त्याचवेळी यावर आयसीसीने वक्तव्य करण्यास नकार दिला. नशीब इंग्लंडच्या बाजूने होते. त्यामुळे त्यांना अखेरच्या षटकात ओवरथ्रोच्या सहा धावा मिळाल्या. इंग्लंडने सामना टाय केला आणि त्यानंतर सुपर ओव्हरही टाय संपला. त्यानंतर अधिक ‘चौकार’ मारण्याच्या आधारावर इंग्लंडला चॅम्पियन घोषित करण्यात आले. श्रीलंकेचे कुमार धर्मसेना व दक्षिण आफ्रिकेचा मारियास इरासमुस मैदानी पंच होते. आयसीसीतर्फे पाचवेळा वर्षांतील सर्वोत्तम पंचाचा मान मिळवणारे टॉफेल म्हणाले, ‘ही निव्वळ चूक आहे. हा खराब निर्णय होता. इंग्लंडला ५ धावा बहाल करायला हव्या होत्या. ’ माजी भारतीय अंपायर के. हरिहरण म्हणाले, ‘कुमार धर्मसेनाने न्यूझीलंडच्या विश्वविजेतेपदाच्या स्वप्नाचा भंग केला. त्याने पाच धावा बहाल करायला हव्या होत्या.’ आयसीसीने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांच्या प्रवक्ताने केवळ एवढेच म्हटले की,‘पंच नियमांच्या आधारावर मैदानात निर्णय घेतात आणि आणि त्यांच्या निर्णयावर आम्ही कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करू इच्छित नाही.’

Web Title: Overview of World Cup finals overthrow will be monitored by MCC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.