पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि तेथेही ट्वेंटी-२० मालिकेत त्यांच्या वाट्याला पराभवच येताना दिसतोय.. पण, या मालिकेसाठी संघात निवड झालेल्या एका 'वजनदार' खेळाडूची जोरदार चर्चा रंगली आहे. तो कुठेही केला तरी त्याला क्वचितच त्याच्या नावाने हाक मारली जाते. त्याला कुणी बटाटा म्हणतो, तर कुणी लड्डू... एवढेच नाही तर हत्ती या नावानेही त्याला हाक मारली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या खेळाडूचे वडील हे पाकिस्तानचे माजी खेळाडू आहेत आणि आजही ते सुपर फिट आहेत.
२५ वर्षीय आजम खान याचा न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत मोहम्मद रिझवानच्या जागी संघात समावेश करण्यात आला. आजम खानचे वडील मोईन खान हे देखील पाकिस्तानचे यष्टिरक्षक होते. मोईन खानने आपल्या देशासाठी २८८ सामने खेळले आहेत. आजम खान पहिल्यांदा प्रकाशझोतात आला जेव्हा त्याची २०१९ मध्ये पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स संघामध्ये निवड झाली. आजमच्या निवडीवर टीका होण्याचे एक कारण म्हणजे या संघाचे प्रशिक्षक त्याचे वडील मोईन खान होते.
खेळाडूच्या फिटनेसला सर्वाधिक महत्त्व दिले जात असताना आजमची निवड सर्वांना आश्चर्यात टाकणारी आहे. आजमला न्यूजीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांत १२ धावाच करता आल्या आहेत. ५ फूट ८ इंच उंच आजम खानने क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो जिथे जातो तिथे त्याला आलू, बटाटा, लाडू, हत्तीपासून बिग बॉयपर्यंत टोपणनावांनी हाक मारली जाते. मोईन खानचा मुलगा आहे यावरून लोक मला न्याय देतात. मला माझ्या नावावरून होणाऱ्या टिंगलसह वडिलांच्या नावावरून होणाऱ्या तुलना, अशी दडपणं घेऊन रहावं लागतं.