रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला काही दिवसांपासून गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. त्याला अचानक वेदना होतात. यावर उपचार घेण्यासाठी तो रांचीतील एका वैद्याकडे गेला. तेथे अवघ्या ४० रुपयांत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. धोनीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. तो फक्त आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळतो. रांचीपासून ७० किमी अंतरावर असलेल्या लम्पुकच्या जंगलात गुडघ्याच्या त्रासावर उपचार सुरू आहेत.
वैद्य वंदनसिंह खेरवार हे उपचार करीत आहेत. एक महिन्यापासून ४० रुपयांत उपचार सुरू आहेत. खेरवार यांना औषधांसाठी २० रुपये आणि फी म्हणून २० रुपये द्यावे लागतात. दर चार दिवसांनी तिथे जातो आणि खेरवार यांच्याकडून उपचारांकरिता औषधी वनस्पती घेतो. धोनीच्या आधी या वैद्यांकडून त्याच्या आई-वडिलांनीदेखील उपचार घेतले आहेत.
धोनी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेला तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाहीत. लोकांनी त्यांना धोनीबद्दल सांगितले. ज्यावेळी तेथे उपस्थित लोकांनी धोनीभोवती गराडा घातला. फोटो काढण्यासाठी लगबग सुरू झाली. वैद्य वंदनसिंह यांच्या म्हणण्यानुसार, कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे धोनीच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना होत आहेत.