ठळक मुद्देपाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची मालिका अखेर रविवारी खंडित झाली.
ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची मालिका अखेर रविवारी खंडित झाली. पण, पाकिस्तानचा संघ इतक्या वाईट पद्धतीनं टीम इंडियाला पराभूत करेल, असे कुणाच्या ध्यानी मनी ही नव्हतं. शाहिन शाह आफ्रिदीनं ( Shaheen Shah Afridi) दिलेल्या धक्क्यातून विराट कोहली व रिषभ पंतनं टीम इंडियाला सावरलं. पण, खेळपट्टीचा रोख पाहता भारतीय गोलंदाजांना १५१ धावांचा बचाव करणं, सोपं नव्हतं. मात्र, त्यांन एकही विकेट घेता आली नाही ही खरी शोकांतिका ठरली. पाकिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर पहिला विजय मिळवला. यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) यानं हा संघाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली.
"हा आमच्या संघाचा प्रयत्न होता आणि सुरूवातीच्या विकेट्स आमच्यासाठी मदतीच्या ठरल्या. यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आणि आमच्या फिरकीपटूंची कामगिरीही चांगली होती," असं बाबर आजमनं सांगितं. "आम्ही ठरवलेल्या गोष्टी केल्या आणि त्याचे परिणाम आम्हाला दिसून आले. आम्ही एक चांगली पार्टनरशिप केली आणि विकेट चांगली होत होती, त्यामुळे आम्हाला अखेरपर्यंत फलंदाजी करायची होती आणि आम्ही तेच केलं," असंही तो म्हणाला.
"हे सोपं नसेल, कारण आम्ही भारताचा पराभव केला आहे. आमचा आत्मविश्वास वाढला असला तरी हा केवळ एकच सामना आहे. अजूनही खुप मोठा पल्ला गाठायचा आहे. आम्ही चांगली तयारी केली होती आणि यापूर्वीचा सामन्यांचा इतिहास आम्ही डोक्यात येऊ दिला नाही. आम्हाला गुणवत्तापूर्ण ट्रेनिग आणि वॉर्मअप मॅचेसची गरज होती. आम्ही देशांतर्गत सामने खेळलो आणि त्या सामन्यांमुळे आम्हाला अधिक आत्मविश्वास मिळाला," असंही आजमनं सांगितलं.
१५२ धावांचं आव्हान
शाहिन शाह आफ्रिदीनं सुरुवातीला धक्के दिल्यानतंरही टीम इंडियानं सामन्यात पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ पुन्हा एकदा घाई करून माघारी परतला, पण त्यानं त्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या.
बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही फॉर्मात असलेली जोडी टीम इंडियावर भारी पडली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही त्यांची ४ शतकी भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन/रोहित शर्मा व केन विलियम्सन व मार्टिन गुप्तील यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. बाबर व रिझवान ही जोडी सातत्यानं चांगली कामगिरी करत होती आणि त्यांना लवकर बाद करणे भारतीय गोलंदाजांना जमलं नाही.
Web Title: pak captain babar azam says early wickets were very helpful against india in t20 world cup 2021 opener
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.