मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्यास भारतीय सैन्याने सुरुवात केली आहे. भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर सर्जिकल स्ट्राईक करताना दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. त्याला पाकिस्तानकडून बुधवारी प्रत्युत्तर मिळाले. गुरुवारी पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधनीचं उल्लंघन करण्यात आहे. भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांत सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वासीम अक्रमने दोन देशांतील परिस्थितीवर महत्त्वाचं विधान केलं आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भारतीय हवाई दलाने घरात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला. बालोकेट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने 1000 किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केला. त्यात जवळपास 300 हून अधिक दहशतवादी ठार झाले. बुधवारी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. पाकिस्तानच्या विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी होताच, भारतीय विमानांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामध्ये पाकिस्तानचे एक विमान नेस्तनाबूत करण्यात आले आहे. पाकिस्तानचे एफ 16 हे विमान कोसळले आहे.
पण, भारताची दोन विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया आणि लष्कराकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भारतीय वायू सेनेच्या कोसळलेल्या विमानांचे फोटो आणि एक व्हिडीओही पाकिस्ताननं व्हायरल केले आहेत. तसेच पाकिस्ताननं एका वैमानिकाला अटक केल्याचाही कांगावा केला असून, त्यासंदर्भातील एक व्हिडीओही व्हायरल केला. परंतु तो व्हिडीओ खरा आहे की खोटा हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
या परिस्थितीवर अक्रम म्हणाला,'' भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शत्रू नाहीत. भारत व पाकिस्तान यांचा शत्रू एकच आहे आणि हे समजण्यासाठी आपण आणखी किती दिवस एकमेकांचे रक्त वाहणार आहोत? दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन लढायला हवं.''