नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) पाकिस्तानने सुपर-4 मध्ये अफगाणिस्तानचा पराभव करून फायनलमध्ये जागा मिळवली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश केला होता. बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानविरूद्ध निसटता विजय मिळवून स्पर्धेत विजयाची हॅट्रिक लगावली आहे. भारतीय संघाला पहिल्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले. बुधवारी झालेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने 1 बळी राखून निसटता विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे सुपर-4 मध्ये पराभूत झालेल्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
विजयाचं सेलिब्रेशन आलं आंगलटदरम्यान, पाकिस्तानचा विजय होताच पाकिस्तानमध्ये जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. या आनंदात देशातील अनेक शहरांमध्ये हवेत गोळीबार करण्यात आला. विजयाचा जल्लोष सुरू असतानाच पेशावर शहरात झालेल्या हवाई गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हवाई गोळीबारात सहभागी असलेल्या 41 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पेशावर शहरातील मतनी अदेजाई भागात घडली आहे. काही लोक इथे पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करत होते आणि त्याचवेळी काहीजण हवेत गोळीबार करत होते. त्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हवेत केलेल्या गोळीबारात सुदैस आणि खय्याम या दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हवाई गोळीबाराच्या घटना समोर आल्या असून पोलिसांनी हवाई गोळीबारात सहभागी असलेल्या 41 जणांना ताब्यात घेतले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानच्या विजयाची हॅट्रिकपाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून सुपर-4 मध्ये आपला दुसरा विजय मिळवला आहे. हॉंगकॉंगला मोठ्या अंतराने पराभूत करून पाकिस्तानने सुपर-4 मध्ये जागा मिळवली होती. बुधवारच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. अखेर 20 षटकांमध्ये 6 बाद 129 एवढी धावसंख्या करून अफगाणिस्तानने 130 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरूवात शानदार झाली होती. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करून पाकिस्तानला घाम फोडला. मात्र अखेरच्या षटकात पाकिस्तानने निसटता विजय मिळवून विजयाची हॅट्रिक लगावली. पाकिस्तानने 19.2 षटकात 9 बाद 131 धावा करून सामना आपल्या नावावर केला.