पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात. मागील वर्षीच्या ट्वेंटी-२० विश्वचषकात तर मैदानातच हाणामारीचा थरार रंगला होता. अफगाणी चाहत्यांनी पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केली, तर पाकिस्तानी फलंदाजाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर बॅट उगारली होती. सध्या या दोन्ही संघांमध्ये वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. काल झालेला दुसरा सामना जिंकून पाकिस्तानने २-० ने विजयी आघाडी घेतली असली तरी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी घातक समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजी अटॅकला चांगलाच घाम फोडला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली पण त्यासाठी पाकिस्तानच्या सर्वच फलंदाजांना खेळपट्टीवर यायला लागलं.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं ३०० धावांचा डोंगर उभारला होता. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज (१५१) आणि इब्राहिन जादरान (८१) यांनी पहिल्या बळीसाठी तब्बल २२७ धावांची भागीदारी नोंदवली. अफगाणिस्तानने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३०० धावा करून पाकिस्तानला ३०१ धावांचे तगडे लक्ष्य दिलं होतं. ३०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं सांघिक खेळी करत विजय साकारला. पण, शादाब खानची विकेट सामन्यात लक्षणीय ठरली. कारण गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खानला ज्या पद्धतीने धावबाद केलं, त्यामुळं चांगलाच वाद रंगला.
शादाब खान मंकडिंगचा शिकार पाकिस्तानी खेळाडू शादाब खान अखेरच्या षटकात मंकडिंगचा शिकार झाला. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी ११ धावांची गरज होती. अशा स्थितीत शेवटच्या षटकात फजलहक फारुकीच्या पहिल्याच चेंडूवर शादाब मंकडिंग पद्धतीनं बाद झाला. शादाब खानला अशा पद्धतीनं बाद केल्यानंतर पाकिस्तानी चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. अशातच सामन्यानंतर कर्णधार बाबर आझमनं देखील आपला राग व्यक्त केला.
शादाब बाद झाल्यानंतर बाबर आझम चांगलाच संतप्त झाला. सामना संपल्यानंतर तो अफगाणिस्तान संघाचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीकडे गेला आणि त्याने काही गोष्टींचा उल्लेख केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव स्पष्ट दिसत होते. बाबर आझमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नसीम शाहच्या खेळीनं पाकिस्तानचा निसटचा विजय नसीम शाहनं पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या तोंडचा घास पळवला. नसीमनं शेवटच्या षटकात दोन चौकार मारलं. त्यानं पाचव्या चेंडूवर चौकार मारून सामना पाकिस्तानच्या नावावर केला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३०० धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग पाकिस्ताननं एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केला.