Join us  

ज्या अफगाणी लोकांना पाकिस्तानातून पळवलं गेलं, हा विजय त्यांच्यासाठी; बाबर आजमच्या जखमेवर मीठ

ICC ODI World Cup PAK vs AFG : वन डे क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला आणि तोही वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 9:51 AM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs AFG :  वन डे क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला आणि तोही वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत. अफगाणिस्तानने सोमवारी चेन्नईच्या मैदानावर पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला पराभवाची जखम दिली आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजाने बाबर आजमच्या संघाच्या जखमेवर मीठ चोळले. ४८ वर्षांच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील इतिहासात पाकिस्तानने २७५+ धावा केल्यानंतर एकही मॅच गमावली नव्हती. अफगाणिस्तानचा हा वन डे क्रिकेटमधील मोठ विजय ठरला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ७ बाद २८२ धावा केल्या. अफगाणिस्तानने हे लक्ष्य एक षटक आधी पूर्ण केले. गुरबाजने ६५, इब्राहिम झाद्रानने ८७, रहमत शाहने नाबाद ७७ आणि शाहिदीने नाबाद ४८ धावा केल्या. झाद्रान हा सामनावीर ठरला आणि त्याने आपला पुरस्कार त्या अफगाण लोकांना समर्पित केला ज्यांना पाकिस्तानने जबरदस्तीने अफगाणिस्तानात परत पाठवले. पुरस्कार स्वीकारताना त्याने हे विधान केलं.

या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल आनंदी असल्याचे झाद्रानने सांगितले. मला फक्त सकारात्मक विचाराने खेळायचे होते. अनेक वेळा मी आणि गुरबाजने चांगली भागीदारी केली आहे. आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळले आहे. मी स्वतःसाठी आणि देशासाठी खूप आनंदी आहे, असे तो म्हणाला. त्याने पुढे म्हटले की, मी सामनावीर पुरस्कार त्या सर्व लोकांना समर्पित करतो ज्यांना पाकिस्तानने अफगाणिस्तानला परत पाठवले होते. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानपाकिस्तान