Pakistan vs Australia, 1st Test : पाकिस्तानच्या ४ बाद ४७६ धावांना ऑस्ट्रेलियाकडून जबरदस्त प्रत्युत्तर मिळाले आहे. यजमान पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताना धावांचा डोंगर उभा केला. इमाम-उल-हक व अझर अली यांच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिला डाव ४ बाद ४७६ धावांवर घोषित केला. त्याला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, उस्मान ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी कडवे उत्तर दिले आहे. पण, या सामन्यात एक पोस्टर खूप व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी तरुणीच्या हातात एक पोस्टर आहे आणि त्यात ती ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज Marnus Labuschagne याला तुझं नाव कसं उच्चारायचं हा प्रश्न विचारतेय.
अब्दुल्लाह शफिक व इमान-उल-हक यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. नॅथन लियॉनने पहिली विकेट मिळवली. शफिक ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर इमाम व अझर अली यांनी दोनशे धावांची भागीदारी केली. इमाम १५७ धावांवर, तर अझर अली १८५ धावांवर माघारी परतले. त्यानंतर आलेला कर्णधार बाबर मोठी खेळी करेल असे वाटले होते, परंतु तो ३६ धावांवर बाद झाला. पाकिस्तानला ४४२ धावांत चौथा धक्का बसला. त्यानंतर पाकिस्तानने ४ बाद ४७६ धावांवर डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची विक्रमी भागीदारी केली. साजीद खानने ही भागीदारी तोडली. वॉर्नर ६८ धावांवर माघारी परतला. ख्वाजाला शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतावे लागले. त्याने १५९ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने ९७ धावा केल्या. ट्रेव्हिस हेड ( ८) लगेच बाद झाला. मार्नस लाबुशेनने १५८ चेंडूंत १२ चौकारांसह ९० धावांची खेळी केली. स्मिथनेही अर्धशतक पूर्ण केले आणि तो पाकिस्तानी गोलंदाजांना सडेतोड उत्तर देत आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत १०६ षटकांत ४ बाद ३६४ धावा केल्या आहेत आणि आणखी ते ११२ धावांनी पिछाडीवर आहेत.