Mohammad Rizwan Pak vs Aus 2nd Test ऑस्ट्रेलियाने पर्थच्या मैदानावर दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला पराभूत केले आणि कसोटी मालिका २-० ने खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव २६४ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २६२ धावा करत, ३१७ धावांचे लक्ष्य पाकिस्तानपुढे ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली झुंज दिली, पण त्यांचा ७९ धावांनी पराभव झाला. या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने केलेल्या एका कृतीचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला.
मोहम्मद रिझवानबाबत काय वाद झाला?
कसोटीच्या दुसऱ्या डावात ३५ धावा करून मोहम्मद रिझवान बाद झाला. त्याची विकेट पॅट कमिन्सने घेतली. पण त्याच्या विकेटवर बरेच वाद झाले. ६१ व्या षटकात कमिन्सकडून आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी रिझवान खाली बसला पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजच्या पट्ट्याला लागला आणि यष्टिरक्षक अलेक्स कॅरीने त्याचा झेल घेतला. ऑनफिल्ड अंपायरने रिझवानला नाबाद ठरवले.
ऑस्ट्रेलियन खेळाडू अंपायरच्या निर्णयावर नाखूश दिसले आणि त्यांनी रिव्ह्यू घेतला. यावेळी रिजवान त्याच्या हाताला स्पर्श करत होता, जणू काही तो म्हणत होता की चेंडू त्याच्या बॅट किंवा ग्लोव्हजच्या कोणत्याही भागाला स्पर्श करून गेलेला नाही. मात्र तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिल्यानंतर खरी गोष्ट समोर आला. चेंडू रिझवानच्या ग्लोव्हजच्या पट्ट्याला लागला होता आणि त्यामुळे तिसऱ्या अंपायरने त्याला बाद दिले. रिप्लेमध्ये बाद असल्याचे स्पष्टपणे दिसत असूनही, पाकिस्तानी चाहते तो निर्णय चुकीचा असल्याचे म्हणताना दिसले. थर्ड अंपायरच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट करण्यात आल्या.