नवी दिल्ली : आतापर्यंत क्रिकेट जगतातील बऱ्याच फलंदाजांच्या शैलीची चर्चा झाली. त्याचबरोबर काही फलंदाज कसे उभे राहतात यावरही बऱ्याच जणांनी आपली मते व्यक्त केली आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या कर्णधाराची विचित्र फलंदाजी हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
यापूर्वी वेस्ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंदरपॉल ज्यापद्धतीने फलंदाजी करायला उभा राहायचा, त्याची चर्चा रंगायची. यापूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार ग्रॅहम गूच, केव्हिन पीटरसन यांची फलंदाजीला उभे राहण्याची शैलीही चर्चेचा विषय ठरली होती. सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अबुधाबी येथे कसोटी मालिका सुरु आहे. या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सर्फराझच्या शैलीवर समाजमाध्यमांवर चर्चा होत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा संघ 282 धावांत सर्वबाद झाला. पाकिस्तानला पहिला धक्का पाच धावांवर बसला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी पाकिस्तानने 52 धावा केल्या. पाकिस्तानला दुसरा धक्का 57 धावांवर बसला. पण पाकिस्तानने आपले चार फलंदाज याच धावसंख्येवर गमावले होते.
पाकिस्तानची 2 बाद 57 वरून 5 बाद 57 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर कर्णधार सर्फराझ अहमदने 94 धावांची खेळी साकारली आणि पाकिस्तानला 282 धावा करता आल्या.