PAK vs AUS 3rd Test Live | सिडनी: सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना म्हणजे शेजाऱ्यांसाठी अस्तित्वाची लढाईच... तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कने एक अप्रतिम चेंडू टाकून पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुला शफीकला बाहेरचा रस्ता दाखवला. खरं तर स्टार्कने शफीकला दोन्ही डावांमध्ये शून्यांवर बाद केले.
अब्दुल्ला शफीकला सिडनी कसोटीत एकही धाव काढता आली नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात स्टार्कने शफीकला त्याच्या दुसऱ्या चेंडूवर बाद केले होते. स्टीव्ह स्मिथने सोपा झेल घेऊन युवा खेळाडूला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसऱ्या डावातही तेच पाहायला मिळाले. पण, यावेळी स्टार्कला कोणत्या क्षेत्ररक्षकाची गरज भासली नाही अन् शफीकचा त्रिफळा उडवण्यात त्याला यश आलं.
तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ३१३ धावा केल्या. पाकिस्तानी फलंदाजांना पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात चांगली कामगिरी करता आली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ पिछाडीवर राहिला आणि त्यांनी आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९९ धावा केल्या. १४ धावांची आघाडी घेऊन पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या डावाची सुरूवात केली. मात्र, इथेही शेजाऱ्यांना लय कायम राखता आली नाही. कारण पाकिस्तानने २६ षटकांत ७ बाद केवळ ६८ धावा केल्या असून आताच्या घडीला ८२ धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाची मजबूत फलंदाजी पाहता यजमान संघाने पुनरागमन केल्याचे दिसते.
मिचेल स्टार्कवर तब्बल २४.७५ कोटींचा वर्षावआयपीएलच्या मिनी लिलावात मिचेल स्टार्कवर पैशांचा पाऊस झाला. त्याला केकेआरच्या फ्रँचायझीने ऐतिहासिक बोली लावून खरेदी केली. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१५ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार्कचे जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये पुनरागमन झाले आहे.