pak vs aus 2nd test live | मेलबर्न : सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियन संघाने विजयी सलामी दिली. सलामीचा सामना गमावल्यानंतर शेजाऱ्यांसाठी सध्या सुरू असलेला दुसरा सामना 'करा किंवा मरा' असा आहे. त्यामुळे मालिकेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. दरम्यान, या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅमेरा आल्याचे पाहताच प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या जोडप्याची चांगलीच धांदल उडाली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक कपल प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत असते. संबंधित तरूणी आणि तरूणी एकमेकांना मिठी मारून बसल्याचे दिसतात. अशातच कॅमेरा येतो अन् त्यांना मोठ्या पडद्यावर दाखवतो. आपण मोठ्या पडद्यावर दिसतोय हे लक्षात येताच जोडप्याची धांदल उडाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ धावा केल्यानंतर पाकिस्तानी संघ अवघ्या २६४ धावांत तंबूत परतला. त्यामुळे यजमान संघाला ५४ धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियन संघाने ६२.३ षटकांत ६ बाद १८७ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली असून पाहुण्या संघासमोर तगडे आव्हान ठेवण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाचे असेल. कांगारूंनी २४१ धावांची आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी संघात अनेक बदल पाहायला मिळाले. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर शान मसूदकडे कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली. तर, शाहीन आफ्रिदी ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनला. संघाशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डात देखील अनेक बदल झाले. मुख्य निवडकर्ता म्हणून वहाब रियाजची निवड झाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक बदल करून देखील शेजाऱ्यांनी निराशाजनक कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना गमावला. त्यामुळे संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.