Pakistan Tour of Australia : पाकिस्तानी संघ आगामी काळात ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाची घोषणा झाली. वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत निवड समिती बरखास्त केली. त्यात बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मागील काही दिवसांत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर नवनिर्वाचित निवडकर्ता वहाब रियाजने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ जाहीर केला. पाकिस्तानी संघ जाहीर झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंगने शेजाऱ्यांची खिल्ली उडवली.
दरम्यान, पाकिस्तानचा संघ ३० नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेजाऱ्यांचा संघ सराव सामने खेळणार असून त्यानंतर १४ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. पाकिस्तानी संघाबद्दल बोलताना पाँटिंगने शेजाऱ्यांच्या गोलंदाजी अटॅकची खिल्ली उडवली.
रिकी पाँटिंगने उडवली खिल्लीकसोटी मालिकेपूर्वी रिकी पाँटिंगने पाकिस्तानी गोलंदाजांची खिल्ली उडवताना म्हटले, "जेव्हा पाकिस्तानचा संघ गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा मी पत्रकारांना सांगितले होते की, आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी संघांमधील हा संघ गोलंदाजीच्या बाजूने सर्वात कमकुवत आहे. पण आज मला वाटते की मी चुकीचा होतो. कारण यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येत असलेले पाकिस्तानी गोलंदाज गेल्या वेळेपेक्षा खूप वाईट आहेत." तसेच शाहीन आफ्रिदी वगळता कोणत्याच गोलंदाजात दम नसल्याचेही त्याने यावेळी सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
- दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
- तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)