क्रिकेट विश्वाचे लक्ष आताच्या घडीला सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांकडे लागून आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ मायदेशात पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्यांच्या घरात कसोटी खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात पराभव करून विजयी सलामी दिली. सध्या या दोन संघांमध्ये दुसरा सामना खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस असून दिवसाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्यास एका अनोख्या कारणामुळे उशीर झाला. कधी पाऊस, कधी खराब प्रकाश तर कधी मैदानात घुसणारा प्रेक्षक... यामुळे सामन्यात व्यत्यय येतो. पण, मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या (AUS vs PAK) तिसर्या दिवशी एक मनोरंजक घटना घडली.
खरं तर झाले असे की, दुसरे सत्र सुरू होणार होते पण थर्ड अम्पायर रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले आणि वेळेवर येऊ शकले नाहीत, त्यामुळे काही मिनिटे खेळ सुरू होऊ शकला नाही. लंच ब्रेकनंतर, ऑस्ट्रेलियाच्या नियोजित वेळेनुसार दुपारी १.२५ वाजता खेळाडू दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीसाठी मैदानात परतले. पण मैदानावरील पंचांनी खेळ सुरू होऊ दिला नाही. मग समालोचकांनी उघड केले की पहिल्या सत्रानंतर ब्रेक दरम्यान लंच संपल्यानंतर इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले. मैदानावरील पंच मायकेल गॉफ आणि जोएल विल्सन हे खेळाडूंना खेळण्यास उशीर होण्याच्या या विचित्र कारणाची माहिती देताना दिसले.
दरम्यान, काही मिनिटांनंतर फोर्थ अम्पायर म्हणून कार्यरत असलेले फिल गिलेस्पी खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी सीमारेषेपासून तिसऱ्या पंचाच्या बॉक्सकडे धावताना दिसले. मग काही वेळानंतर इलिंगवर्थ मैदानात दिसले अन् चाहत्यांसह व्यवस्थापकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या आगमनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दुसरा सामना पाकिस्तानी संघासाठी 'करा किंवा मरा' असा आहे. कारण मालिकेत जिवंत राहण्यासाठी शेजाऱ्यांना कोणत्याही परिस्थिती दुसरी कसोटी जिंकावी लागले. लक्षणीय बाब म्हणजे मागील २८ वर्षांत एकदाही पाकिस्तानी संघाला ऑस्ट्रेलियाचा धरतीवर विजय मिळवता आला नाही. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या मीर हमजाने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. त्याने डेव्हिड वॉर्नरला (६) पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्याचवेळी पुढच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेड बाद झाला. त्याआधी आज पाकिस्तानचा पहिला डाव २६४ धावांवर आटोपला आणि पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ५४ धावांची आघाडी मिळाली.