David Warner Shaheen Shah Afridi, PAK vs AUS: पाकिस्तान विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्या डावात बिनबाद ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३९१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यास प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा (Pakistan) संघाने ऐटीत अडीचशेपर्यंत मजल माजली. पण त्यानंतर अवघ्या २० धावांमध्ये (२६८) त्यांचा डाव आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावासाठी मैदानात ऑस्ट्रेलियन संघ खेळायला उतरला असताना एक प्रसंग घडला.
तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावाच्या खेळासाठी जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ आला तेव्हा फारसा वेळ शिल्लक नव्हता. त्यामुळे केवळ ३ षटकांचाच खेळ झाला. पण त्यातही एक झक्कास क्षण चाहत्यांना अनुभवायला मिळाला. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीने वॉर्नरला चेंडू टाकला. तो चेंडू खेळल्यानंतर आफ्रिदी त्याच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्यास प्रत्युत्तर म्हणून वॉर्नरदेखील धिप्पाड आफ्रिदीसमोर जाऊन उभा ठाकला आणि त्याने त्याच्या नजरेला नजर देत 'झुकेगा नहीं साला...' या डायलॉग प्रमाणे अँटीट्यूड दाखवला. पाहा व्हिडीओ-
हा व्हिडीओ काही मिनिटांत व्हायरल झालाच. पण त्यासोबतच हा फोटोदेखील तुफान व्हायरल झाला. सोशल मीडियावर या फोटोवरून वेगवेगळ्या व मजेशीर कमेंट्स पाहायला मिळाल्या.
दरम्यान, त्याआधी पाकिस्तानच्या पहिल्या डावात अब्दुला शफीक (८१) आणि अझर अली (७८) या दोघांनी १५० धावांची तगडी भागीदारी केली. त्यानंतर बाबर आझमनेही ६७ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था ३ बाद २४८ होती. पण त्यानंतर सामना फिरला. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फवाद आलम, नसीम शाह या चौघांना मिचेल स्टार्कने माघारी धाडलं. तर, आधीच दोन बळी टिपलेल्या कर्णधार पॅट कमिन्सने साजीद खान, नौमन अली आणि हसन अली यांचा काटा काढला. त्यामुळे घरच्याच मैदानावर २० धावांमध्ये तब्बल ७ गडी गमवण्याची लाजिरवाणी वेळ पाकिस्तानच्या संघावर ओढवली.