सिडनी : डेव्हिड वाॅर्नरने घरच्या मैदानावर अखेरच्या कसोटी डावात ५७ धावा करून ११२ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीला अलविदा केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने शनिवारी तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला आठ गडी राखून नमविताना ३-० असा क्लीन स्वीप देत वाॅर्नरला विजयी निरोप दिला. पाकिस्तानचा आमिर जमाल सामनावीर ठरला तर पॅट कमिन्स मालिकावीर ठरला.
ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी लक्ष्यापासून अवघ्या ११ धावा दूर असताना वाॅर्नरला साजिद खानने पायचित केले. सिडनी क्रिकेट ग्राउंडवरून तो पॅव्हेलियनकडे परतत असताना चाहत्यांनी उभे राहून त्याला अभिवादन केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावात बाद होणारा तो दुसरा फलंदाज होता. साजिदने याआधी सलामीवीर उस्मान ख्वाजा (०) यालाही पायचित केले होते. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य ठेवले होते. यजमानांनी दोन गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. वाॅर्नरशिवाय मार्नस लाबुशेननेही (नाबाद ६२) अर्धशतक झळकावले. त्याला स्टिव्ह स्मिथने (नाबाद ४) साथ दिली.
पाकिस्तानने पहिल्या डावात ३१३ धावा करताना समाधानकारक धावसंख्या उभारली होती. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २९९ धावाच करता आल्या. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात केवळ ११५ धावांवर बाद झाला. पाकिस्तानने सकाळी आपला दुसरा डाव सात बाद ६८ धावांवरून सुरू केला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जोश हेजलवूड (४ बळी) याने पाकिस्तानला झटपट गुंडाळले. सामन्याच्या चौथ्या दिवशी मोहम्मद रिझवान (२८) आणि आमिर जमाल (१८) यांनी आठव्या गड्यासाठी ४२ धावा जोडून काही काळ संघर्ष केला.
नॅथन लियाेनने रिजवानला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पाकिस्तानचा डाव झटपट गुंडाळला गेला. लियाेनने हसन अलीला बाद करत पाकिस्तानचा डाव संपुष्टात आणला. त्याने ३६ धावांत ३ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियन संघाने याआधी वाॅर्नरच्या नेतृत्वाखाली मैदानावर पाऊल ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये पहिल्या कसोटीत ३६० धावांनी आणि दुसऱ्या कसोटीत ७९ धावांनी विजय मिळवला होता.
मी प्रत्येकाचा आवडता खेळाडू नाही : वॉर्नर
अखेरच्या कसोटी सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला, अनेकांना मी खेळाडू म्हणून आवडायचो नाही; पण मला जितके शक्य होते तितके चांगले क्रिकेट खेळण्याचा मी प्रयत्न केला. तसेच संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असायचा. जर माझ्याकडे अजून वेळ असता तर मी माझी कारकीर्द अधिक चांगली सजवू शकलो असतो. जेव्हा मी ऑस्ट्रेलियाकडून खेळायला सुरुवात केली तेव्हा मला प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध स्लेजिंग करण्याची भूमिका मिळाली होती; पण कालांतराने मी या भूमिकेतून बाहेर निघालो. थोडा शांत झालो. मुळात मी अशाच स्वभावाचा आहे. सध्याचे क्रिकेट खूप बदललेले आहे. अनेक खेळाडू तुमच्यासोबत असतात तर अनेक तुमच्या विरोधात उभेदेखील असतात. प्रत्येक वेळी तुम्हाला आक्रमक होण्याची गरज नाही.