David Warner Wife Candice, PAK vs AUS: कराची येथील नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने हातोडीच्या मदतीने खेळपट्टीवर काही डागडुजी केली. तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटच्या ट्विटर हँडलने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हातोड्याने पिचवरील उंचवटा कमी करतानाचाही एक व्हिडिओ पोस्ट केला. इंटरनेटवर तो व्हिडिओही व्हायरल झाला. याट व्हिडीओवर वॉर्नरच्या पत्नीने भन्नाट कमेंट केली.
वॉर्नर शेवटच्या तासाच्या खेळात फूटमार्कवर हातोडा मारताना दिसला. त्यावर, "थॉरच्या हॅमरने आज आणखी एक कॅमिओ दिला", असं PCBने कॅप्शन दिलं. याच व्हिडीओवर डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नर हिने कमेंट केली. अशाप्रकारे डेव्हिड वॉर्नरने घरच्या कामांमध्येही मला मदत केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे, असं मजेशीर प्रतिक्रिया तिने दिली.
पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील वॉर्नरच्या मैदानावरील कृती इंटरनेटवर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत वॉर्नर प्रसिद्ध भारतीय चित्रपट पुष्पामधील डान्स स्टेप्स करताना दिसला होता. तसेच, काही वेळाने त्याने भांगडा नृत्य करत पाकिस्तानी चाहत्यांचे मनोरंजनदेखील केल्याचं कॅमेरात कैद झालं होतं.
दरम्यान, पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियाने ५०६ धावांचे अवाढव्य लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबरचं पहिलंवहिलं द्विशतक अवघ्या चार धावांनी हुकलं. पण त्याने जी झुंजारवृत्ती दाखवली, त्याचं ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही कौतुक केलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने झुंजार कामगिरी करत संघाचा पराभव वाचवला. १९६ धावांची दमदार खेळी करत त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा घाम काढला. त्याचा साथीदार मोहम्मद रिझवान यानेही दमदार शतक ठोकलं. बाबर आणि रिझवान जोडीने चौथ्या डावाचा पाया रचला. त्यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचं मनोधैर्य खचलं. रिजवान बाद झाल्यावर बाबरने अतिशय शांत व संयमीपणे सामना पुढे नेला आणि संघाला पराभवाच्या छायेतून वाचवण्यासाठी तब्बल १० तासांहून अधिक काळ खेळपट्टीवर काढला.
Web Title: PAK vs AUS Test David Warner Thor Hammer moment Video goes viral wife Candice reacts with hilarious comment
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.