मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत असलेल्या पाकिस्तानी संघाला चांगलाच संघर्ष करावा लागत आहे. सलामीचा सामना गमावल्यानंतर शेजाऱ्यांसाठी सध्या सुरू असलेला दुसरा सामना 'करा किंवा मरा' असा आहे. त्यामुळे मालिकेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. खरं तर पाकिस्तानची ऑस्ट्रेलियात 'कसोटी' लागत असली तरी शेजाऱ्यांनी काही नाट्यमय घडामोडी करून उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर काल प्रेक्षकांसोबत थिरकल्याचे पाहायला मिळाले होते. आज असेच काहीसे पाकिस्तानच्या हसन अलीने केले. त्याने प्रेक्षकांसोबत डान्स केला अन् एकच हशा पिकला. पाकिस्तानी खेळाडूची ही अदा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. याशिवाय हसन अलीने एका ऑस्ट्रेलियन चाहत्याच्या कपाळावर ऑटोग्राफ दिला, ज्याची झलक आयसीसीने देखील शेअर केली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ धावा केल्यानंतर पाकिस्तानी संघ अवघ्या २६४ धावांत तंबूत परतला. त्यामुळे यजमान संघाला ५४ धावांची आघाडी मिळाली. आताच्या घडीला ऑस्ट्रेलियन संघ ६२.३ षटकांत ६ बाद १८७ धावांवर खेळत आहे. त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली असून पाहुण्या संघासमोर तगडे आव्हान ठेवण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाचे असेल.
पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी संघात अनेक बदल पाहायला मिळाले. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर शान मसूदकडे कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली. तर, शाहीन आफ्रिदी ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनला. संघाशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डात देखील अनेक बदल झाले. मुख्य निवडकर्ता म्हणून वहाब रियाजची निवड झाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक बदल करून देखील शेजाऱ्यांनी निराशाजनक कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना गमावला. त्यामुळे संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानी संघ - शान मसूद (कर्णधार), इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा, आमिर जमाल, साजिद खान.