pak vs aus test 2023 schedule | नवी दिल्ली : पाकिस्तानी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील सलामीचा सामना यजमान ऑस्ट्रेलियाने मोठ्या फरकाने आपल्या नावावर केला. तब्बल ३६० धावांनी पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. नवविर्वाचित कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ मालिका खेळत आहे. रविवारी पहिल्या सामन्याचा निकाल लागला अन् पाकिस्तानी संघ अवघ्या ८९ धावांत आटोपला. पहिल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि टीम डायरेक्टर मोहम्मद हाफिजने अद्याप आम्ही मालिका जिंकू असा दावा केला.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव केला. रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशीच पाकिस्तानचा पराभव करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. ऑस्ट्रेलियन संघाने ५ बाद २३३ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावाच्या आधारे कांगारूंकडे २१६ धावांची आघाडी होती. अशा स्थितीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ४४९ धावांची झाली आणि पाकिस्तानला ४५० धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ प्रत्युत्तरात ८९ धावांवर गारद झाला.
पाकिस्तानला भलताच कॉन्फिडन्समोहम्मद हफिजने २००३ ते २०१९ या कालावधीत एकूण ५५ कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर बोलताना हफिजने सांगितले की, पाकिस्तानी संघात चांगल्या खेळाडूंची फळी असून टॅलेंटची कमी नाही. त्यामुळे ते अद्याप ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात धरतीवर चीतपट करू शकतात. पहिल्या सामन्यात आम्ही चांगला खेळ केला नाही, आम्ही आमच्या रणनीतीनुसार पुढे गेलो नसल्याने पराभव झाला. त्यामुळे मला वाटते की, पाकिस्तान अद्याप ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका जिंकू शकतो. पण त्यासाठी आम्हाला रणनीतीनीतीनुसार खेळ करावा लागेल.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना जिंकून यजमानांनी विजयी सलामी दिली. तर, दुसरा सामना मेलबर्न येथे २६ तारखेपासून खेळवला जाईल. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानी संघ १९९५ पासून १५ कसोटी सामन्यांपैकी एकही सामना ऑस्ट्रेलियात जिंकला नाही.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
- दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
- तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)