pak vs aus test schedule | कॅनबेरा : पाकिस्तानी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेला १४ तारखेपासून सुरूवात होत आहे, यापूर्वी कांगारूंच्या धरतीवर शेजाऱ्यांचा संघ सराव सामना खेळत आहेत. शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियात चार दिवसांचा सराव सामना खेळत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाचा पर्दाफाश झाला. खरं तर ना षटकार ना चौकार तरीही पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी एका चेंडूवर सात धावा दिल्या.
ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू रेनशॉने अबरार अहमदच्या एका चेंडूवर सात धावा कुटल्या आणि तेही कोणत्याही वाइड किंवा नो बॉलशिवाय. शान मसूदच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर पाकिस्तानने पहिला डाव ९ बाद ३९१ धावा करून घोषित केला. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन संघाने सावध खेळी करताना ३ गडी गमावून ३०० धावा केल्या. कॅनबेरा येथे हा सराव सामना खेळवला जात आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान इलेव्हनच्या डावाच्या ७७ व्या षटकात अबरार अहमदच्या चेंडूवर मॅथ्यू रेनशॉने शानदार शॉट मारला. चेंडू सीमारेषेकडे जात होता पण मीर हमजाने चेंडू सीमारेषेजवळ थांबवला आणि गोलंदाजीच्या टोकाला उभ्या असलेल्या बाबरच्या दिशेने फेकला. बाबरला वाटले की दुसऱ्या टोकाचा फलंदाज खेळपट्टीपर्यंत पोहोचला नाही आणि त्याने चेंडू यष्टीरक्षक सर्फराज अहमदच्या दिशेने फेकला. सर्फराज यासाठी तयार नव्हता आणि चेंडू पकडू शकला नाही. मग चेंडू थेट सीमापार गेला. अशाप्रकारे रेनशॉने धाव घेत ३ धावा घेतल्या आणि त्याला चौकारावर आणखी ४ धावा मिळाल्या. अशा प्रकारे त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -
शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
- दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
- तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
Web Title: pak vs aus test warm up match Babar Azam mis-throws, Sarfraz Ahmed not careful and Pakistan concede seven runs off one ball
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.