PAK vs BAN Test Live । रावळपिंडी : पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. अब्दुला शफीक, कर्णधार शान मसूद आणि बाबर आझम स्वस्तात तंबूत परतले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशीरा सुरू झाला. नाणेफेक जिंकून पाहुण्या बांगलादेशने यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संघाची धावसंख्या ३ असताना पाकिस्तानला अब्दुला शफीकच्या (२) रूपात पहिला झटका बसला. त्यानंतर शान मसूद (६) तंबूत परतला. मग माजी कर्णधार बाबर आझमला खातेही उघडता आले नाही. शोरफुल इस्लामने बाबर आणि मसूदला बाहेरचा रस्ता दाखवला, तर हसन महमूदने शफीकला बाद केले.
आजपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. याआधी मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हापासून ते विजयाच्या शोधात आहेत. पाकिस्तानच्या संघातील प्रमुख खेळाडू बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यावर कोणतीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नाही. तर सौद शकीलला लॉटरी लागल्याचे दिसते. कारण त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), अब्दुला शफीक, सैय अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली अघा, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली.
बांगलादेशचा संघ - नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकिर हसन, मोमिनूल हक, मुशफिकुर रहमान, शाकिब अल हसन, लिटन दास, महेदी हसन मिराज, शोरफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा.