PAK vs BAN 1st Test | रावळपिंडी : पाकिस्तान आपल्या मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. बुधवारी या मालिकेतील सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ११३ षटकांत ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर शेजाऱ्यांनी पहिल्याच डावात मजबूत पकड बनवली. (Pakistan and Bangladesh at the Rawalpindi Cricket Stadium) अशातच आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चाहत्यांना एक खुशखबर दिली.
विकेंड लक्षात घेता मोठ्या संख्येने चाहत्यांनी मैदानात हजेरी लावावी आणि सामन्याचा आनंद घ्यावा या हेतूने पीसीबीने विनामूल्य एन्ट्री ठेवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन काढून ही माहिती दिली. सध्या सुरू असलेला कसोटी सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. (ICC World Test Championship 2023-25)
आजपासून सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाईल. ज्या चाहत्यांनी चौथ्या आणि पाचव्या दिवसांची आधीच तिकीटे खरेदी केली आहेत, त्यांना ती रक्कम माघारी केली जाईल. ज्या प्रेक्षकांनी ऑफलाइन पद्धतीने तिकीटे खरेदी केली आहेत अशा चाहत्यांना परतावा मिळवण्यासाठी त्यांचे मूळ तिकीट देऊन उरलेले पैसे घेता येतील. याशिवाय चाहत्यांच्या सोयीसाठी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये सहज प्रवेश मिळावा यासाठी दोन मार्गांवर मोफत बस सेवा सुरू राहील.
पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), अब्दुला शफीक, सैय अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली अघा, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली.
बांगलादेशचा संघ - नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकिर हसन, मोमिनूल हक, मुशफिकुर रहमान, शाकिब अल हसन, लिटन दास, महेदी हसन मिराज, शोरफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा.