PAK vs BAN Test Series : पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या संघाने शेजाऱ्यांना त्यांच्याच घरात घुसून पराभूत केले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. सलामीचा सामना जिंकून बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली. आपल्या घरच्या मैदानावर बांगलादेशसारख्या संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानी संघावर टीका होत आहे. शेजारील देशातील माजी खेळाडू कर्णधार शान मसूदवर तोंडसुख घेत आहेत. यात इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूची भर पडली असून, त्याने पाकिस्तान सुपर लीगचा दाखला देत पाकिस्तानला डिवचले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मग बांगलादेशने प्रत्युत्तरात असामान्य कामगिरी केली. त्यांनी सर्वबाद ५६५ धावा करून शेजाऱ्यांना घाम फोडला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांनी केवळ १४६ धावा केल्याने बांगलादेशला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती. बांगलादेशने एकही गडी न गमावता ३० धावा करून पहिला सामना आपल्या नावावर केला. पाकिस्तानला आपल्या मायदेशात सलग नवव्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. बांगलादेशच्या संघाला हलक्यात घेणाऱ्या पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली.
इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हिट पीटरसनने पाकिस्तानच्या पराभवावर भाष्य केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पीटरसनने म्हटले की, पाकिस्तानच्या क्रिकेटला नक्की काय झाले आहे? मी जेव्हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळायचो तेव्हा क्रिकेट स्टँडर्ड खूप चांगले होते. चांगल्या खेळाडूंची फळी होती. युवा खेळाडू त्यांचे टॅलेंट दाखवत होते. पण, आता नेमके काय होत आहे? एकूणच पाकिस्तानचा गचाळ खेळ पाहून पीटरसनही अवाक् झाला.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी खेळाडू बाबर आझमसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सडकून टीका करत आहेत. बाबरला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर तर दुसऱ्या डावात तो अवघ्या २२ धावा करून तंबूत परतला. मोहम्मद रिझवानने पहिल्या डावात शतकी आणि दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून डाव सावरला पण तो संघाला विजयी करू शकला नाही.