PAK vs BAN 1st Test | रावळपिंडी : शाहीन आफ्रिदी कसोटी सामना खेळत असताना त्याला खुशखबर मिळाली. खरे तर तो बाप झाला असून, त्याची पत्नी अंशाने एका मुलाला जन्म दिला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात चमक दाखवली. यजमानांना कडवी झुंज देताना त्यांनी पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. पाकिस्तान आपल्या मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. बुधवारी या मालिकेतील सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ११३ षटकांत ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात पाहुण्या बांगलादेशने सर्वबाद ५६५ धावा करून ११७ धावांची आघाडी घेतली.
पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदीने महेदी हसनला बाद करताच अनोखे सेलिब्रेशन केले. नुकताच बाप झालेल्या आफ्रिदीचे हे सेलिब्रेशन सर्वांचे लक्ष वेधत आहे.
बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक खेळी केली, त्याने १ षटकार आणि २२ चौकारांच्या मदतीने ३४१ चेंडूत १९१ धावांची शानदार खेळी केली. पण, तो केवळ नऊ धावांनी द्विशतकाला मुकला. मोहम्मद अलीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. तेव्हा बांगलादेशची धावसंख्या १५६.५ षटकांत ७ बाद ५२८ अशी होती. बांगलादेशकडून सलामीवीर शदमन इस्लाम (९३), मोमिनुल हक (५०), लिटन दास (५६), आणि मेहदी हसन (७७) यांनीही अप्रतिम खेळी केली. पाकिस्तानकडून नसीम शाहने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर मोहम्मद अली, खुर्रम शहजाद, शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. याशिवाय सैय अयुबला एक बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, कसोटी सामना सुरू असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला खुशखबर मिळाली. त्याची पत्नी अंशाने मुलाला जन्म दिला आहे. बाप झालेला शाहीन रविवारी कराचीला जाईल आणि दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पुन्हा रावळपिंडीत दाखल होईल. शाहीनच्या या निर्णयामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये अंशाने पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी लग्न केले. अंशा ही पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे.