PAK vs BAN 1st test match : पाकिस्तान क्रिकेट संघाला आपल्या घरात बांगलादेशकडून कसोटी सामना गमवावा लागल्याने त्यांची फजिती झाली. शेजारील देशातील माजी खेळाडू शान मसूदच्या संघावर तोंडसुख घेत आहेत. त्यात आयसीसीने पाकिस्तानवर कारवाई करत स्लो-ओव्हर रेटिंगमुळे दंड ठोठावला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून बांगलादेशने विजयी सलामी दिली. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपले मत मांडले. पाकिस्तानी संघ कसोटी क्रिकेटमध्ये मागील तीन वर्षांपासून खराब कामगिरी करत असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.
निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी माझ्याकडे कोणती जादूची कांडी नाही. आपली मागील तीन वर्षांपासून मायदेशातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे... नेहमीच पाकिस्तानचा पराभव होत आला आहे. आपण आपल्या घरी शेवटचा कसोटी सामना कधी जिंकलो? क्रिकेटमध्ये लक्षणीय बदल करण्यासाठी तुम्हाला योग्य साधनांची गरज आहे. बांगलादेशविरुद्धचा पराभव खूपच निराशाजनक आहे. मी खेळपट्टीचा अहवालही मागवला आहे. निवड समितीने १७ खेळाडूंची निवड केली होती, प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रशिक्षक आणि कर्णधाराकडून काही चुका झाल्या असू शकतात, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी नमूद केले.
पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मग बांगलादेशने प्रत्युत्तरात असामान्य कामगिरी केली. त्यांनी सर्वबाद ५६५ धावा करून शेजाऱ्यांना घाम फोडला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांनी केवळ १४६ धावा केल्याने बांगलादेशला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती. बांगलादेशने एकही गडी न गमावता ३० धावा करून पहिला सामना आपल्या नावावर केला.