Join us  

पराभवानंतर पाकिस्तानला मोठा झटका; ICC ने जखमेवर मीठ चोळले, शाकीबवरही कारवाई

PAK vs BAN 1st test : पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 6:10 PM

Open in App

PAK vs BAN 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा धक्कादायक निकाल लागला. यजमान पाकिस्तान सामना अनिर्णित करेल असे अपेक्षित असताना बांगलादेशने शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली. या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पाकिस्तानला मायदेशात पराभव पत्करावा लागल्याने माजी खेळाडू शान मसूदच्या संघावर तुटून पडले. शाहीन आफ्रिदी, बाबर आझम आणि नसीम शाह यांच्यावरही टीका होत आहे. अशातच आता आयसीसीने शेजाऱ्यांसह बांगलादेशला मोठा झटका दिला. 

वेळेत षटके पूर्ण न करणाऱ्या पाकिस्तानवर आयसीसीने कारवाई केली. रावळपिंडी येथील पहिल्या कसोटीत स्लो ओव्हर-रेट कायम ठेवल्याने पाकिस्तानला ३०% मॅच फीचा दंड आणि ६ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच बांगलादेशला मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला असून, ३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्सचा फटका बसला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला त्याच्या मॅच फीच्या १०% दंड आणि ICC आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्याबद्दल एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. पाकिस्तानच्या डावाच्या ३३व्या षटकात त्याने मोहम्मद रिझवानला गोलंदाजी करताना रागात यष्टीरक्षकाकडे चेंडू फेकला होता. 

पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मग बांगलादेशने प्रत्युत्तरात असामान्य कामगिरी केली. त्यांनी सर्वबाद ५६५ धावा करून शेजाऱ्यांना घाम फोडला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांनी केवळ १४६ धावा केल्याने बांगलादेशला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती. बांगलादेशने एकही गडी न गमावता ३० धावा करून पहिला सामना आपल्या नावावर केला. 

टॅग्स :बांगलादेशपाकिस्तानआयसीसी