PAK vs BAN 2nd Test Match Live Updates | रावळपिंडी : सलामीच्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला. पाहुण्या बांगलादेशनेपाकिस्तानला दणका देत दुसरा सामना देखील जिंकला. यासह शेजाऱ्यांना आपल्या घरात सलग दहाव्या सामन्यात विजयापासून दूर राहावे लागले. खरे तर पाकिस्तानला मायदेशात झालेल्या मागील दहा सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी करताना २-० ने मालिका खिशात घातली. दुसरा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला मोठा संघर्ष करावा लागला असली तरी त्यांच्या या कामगिरीने इतिहास रचला. (pak vs ban live test) दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने सहा गडी राखून मोठा विजय मिळवला. १८५ धावांचे लक्ष्य गाठताना बांगलादेशने ४ बाद १८५ धावा करुन मालिका आपल्या नावावर केली.
दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणून नियोजित वेळापत्रकातील पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या यजमान पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात अवघ्या २७४ धावा केल्या. सततच्या पावसामुळे खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत होती. पाकिस्तानला स्वस्तात गुंडाळल्यानंतर बांगलादेश मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. मात्र, त्यांना पहिल्या डावात केवळ २६२ धावांपर्यंत पोहोचता आले. मग दुसऱ्या डावात पाकिस्तानने १७२ धावा करुन बांगलादेशला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले. याचा कसाबसा पाठलाग करत बांगलादेशने विजय साकारला आणि पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा चीतपट केले.
उल्लेखनीय कामगिरी करणारे शिलेदार
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेकदा पावसाने हजेरी लावली. पहिल्या डावात पाकिस्तानकडून सैय अयुब (५८) आणि कर्णधार शान मसूद (५७) यांनी साजेशी खेळी केली. यजमानांना रोखताना बांगलादेशकडून मेहदी हसनने (५) बळी घेतले. बांगलादेशच्या पहिल्या डावात त्यांची फलंदाजी कोलमडली. पण, लिटन दास (१३८) आणि मेहदी हसन (७८) यांनी संघर्ष करून सन्मानजनक धावसंख्या उभारली. दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून एकालाही अर्धशतक झळकावता आले नाही. अघा सलमानने सर्वाधिक ४७ धावांची नाबाद खेळी केली. या डावात बांगलादेशच्या हसन महमूद (५) आणि नाहिद राणा (४) यांनी जबरदस्त गोलंदाजी करुन शेजाऱ्यांची पळता भुई थोडी केली. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात पाहुण्यांच्या फलंदाजांची आणि यजमानांच्या गोलंदाजांची 'कसोटी' पाहायला मिळाली. बांगलादेशने कठीण खेळपट्टीवर संघर्ष करत १८५ धावांपर्यंत मजल मारुन विजय साकारला. त्यांच्या संघाकडून झाकीर हसनने सर्वाधिक (४०) धावा कुटल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली पण त्यांना पराभव टाळता आला नाही.
Web Title: PAK vs BAN 2nd Test Match Live Updates Bangladesh created history by winning two consecutive matches to win the series against Pakistan 2-0
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.