PAK vs BAN 2nd Test : बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानसमोर आहे. पाकिस्तानला आपल्या मायदेशात बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवावा लागला होता. यासह पाहुण्या बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे दुसरा सामना पाकिस्तानसाठी 'करा किंवा मरा' असा आहे. कारण आपल्या घरात मालिका बरोबरीत संपवण्याचे मोठे आव्हान शान मसूदच्या नेतृत्वातील संघासमोर आहे. या मालिकेतील दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान रावळपिंडी येथे खेळवला जाईल. सलामीच्या सामन्यात बांगलादेशच्या फिरकीपटूंनी कमाल करत यजमानांची पळता भुई थोडी केली. आता पाकिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीपटू अबरार अहमदला संधी दिली आहे.
दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानने संघात काही बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला डच्चू किंबहुना विश्रांती दिल्याचे दिसते. अलीकडेच बाप झालेला शाहीन घरी परतला होता. पण, मंगळवारी पुन्हा तो संघासोबत जोडला गेला.
दुसऱ्या कसोटी पाकिस्तानचा संघ -
शान मसूद (कर्णधार), सौद शकील, अबरार अहमद, बाबर आझम, मोहम्मद अली, सलमान अली अघा, सैय अयुब, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, अब्दुला शफीक, नसीम शाह, खुर्राम शहजाद.
लाज राखण्यासाठी पाकिस्तानची 'कसोटी'
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मग बांगलादेशने प्रत्युत्तरात असामान्य कामगिरी केली. त्यांनी सर्वबाद ५६५ धावा करून शेजाऱ्यांना घाम फोडला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांनी केवळ १४६ धावा केल्याने बांगलादेशला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती. बांगलादेशने एकही गडी न गमावता ३० धावा करून पहिला सामना आपल्या नावावर केला. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचे आव्हान यजमान पाकिस्तानसमोर आहे.
Web Title: PAK vs BAN 2nd Test Pakistan Cricket Board has announced its squad and Shaheen Shah Afridi has been left out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.