PAK vs BAN 1st test match : सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. पहिला सामना जिंकून पाहुण्या बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तान क्रिकेट संघाला आपल्या घरात बांगलादेशकडून कसोटी सामना गमवावा लागल्याने त्यांची फजिती झाली. शेजारील देशातील माजी खेळाडू शान मसूदच्या संघावर तोंडसुख घेत आहेत. त्यात आयसीसीने पाकिस्तानवर कारवाई करत स्लो-ओव्हर रेटिंगमुळे दंड ठोठावला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून बांगलादेशने विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यातील शेवटचे तीन दिवस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चाहत्यांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश ठेवला होता.
बांगलादेशसारख्या नवख्या संघाने पराभूत केल्याने पाकिस्तानवर टीका होत आहे. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना लक्ष्य केले जात आहे. अशातच त्यांनी एक मोठा निर्णय घेत दुसरा कसोटी सामना विद्यार्थ्यांना मोफत पाहता येईल असे जाहीर केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, युवा पिढीला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करण्यासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यात विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा शालेय गणवेश घालावा लागेल आणि गेटवर शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र दाखवावे लागेल.
मायदेशात पाकिस्तानची नाचक्की
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मग बांगलादेशने प्रत्युत्तरात असामान्य कामगिरी केली. त्यांनी सर्वबाद ५६५ धावा करून शेजाऱ्यांना घाम फोडला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांनी केवळ १४६ धावा केल्याने बांगलादेशला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती. बांगलादेशने एकही गडी न गमावता ३० धावा करून पहिला सामना आपल्या नावावर केला.