Join us  

बांगलादेशकडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; PCB च्या मोठ्या निर्णयाने खेळाडूंना घाम फुटला

pak vs ban test : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:12 PM

Open in App

बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानचा त्यांच्या घरात घुसून त्यांचा दारुण पराभव केला. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. बांगलादेशने २-० ने विजय संपादन करत इतिहास रचला. दुसरा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला मोठा संघर्ष करावा लागला असली तरी त्यांच्या या कामगिरीने इतिहास रचला. या विजयामुळे बांगलादेशच्या संघाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला असेल यात शंका नाही. विजयानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतोने बोलकी प्रतिक्रिया देताना टीम इंडियाला इशारा दिला. १९ तारखेपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानी खेळाडूंना केंद्रीय करारात मोठा फटका बसू शकतो. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुढील १२ महिन्यांसाठी केंद्रीय करार जाहीर करण्यापूर्वी खेळाडूंच्या फिटनेस चाचण्या घेण्याच्या मनस्थितीत आहे. केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेले खेळाडू आणि इतर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश केला जाईल. ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान लाहोरमध्ये फिटनेस चाचणी घेतली जाईल आणि मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि संघाचे फिजिओथेरपिस्ट तसेच प्रशिक्षक या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. फिटनेस चाचणीमुळे या वर्षी कोणत्या खेळाडूंना करार मिळेल हे ठरवले जाईल. मात्र, कामगिरीलाही प्राधान्य दिले जाईल.

बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरीपाकिस्तानला मागील जवळपास तीन वर्षांपासून आपल्या घरात एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदला कर्णधारपद सोपवल्यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया दौरा केला आणि तिथेही त्यांना जबर मार खावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे WTC च्या शर्यतीत कायम राहणे शेजाऱ्यांना कठीण झाले आहे. वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी सर्वच फॉरमॅटमध्ये पाकिस्तानची 'कसोटी' पाहायला मिळत आहे. खरे तर पाकिस्तानला तब्बल १,३०३ दिवसांपासून आपल्या घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. विशेष म्हणजे बांगलादेश नंतर इतर सर्वात जुन्या दहा कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांपैकी प्रत्येकाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावणारा पाकिस्तान हा दुसरा संघ ठरला आहे.

दरम्यान, सलामीच्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला. पाहुण्या बांगलादेशने पाकिस्तानला दणका देत दुसरा सामना देखील जिंकला. यासह शेजाऱ्यांना आपल्या घरात सलग दहाव्या सामन्यात विजयापासून दूर राहावे लागले.

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेश