PAK vs BAN 1st Test | रावळपिंडी : सलामीच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद वादग्रस्त निर्णयावर बाद झाला. आजपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. अब्दुला शफीक, कर्णधार शान मसूद आणि बाबर आझम स्वस्तात तंबूत परतले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशीरा सुरू झाला. नाणेफेक जिंकून पाहुण्या बांगलादेशने यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संघाची धावसंख्या ३ असताना पाकिस्तानला अब्दुला शफीकच्या (२) रूपात पहिला झटका बसला. त्यानंतर शान मसूद (६) तंबूत परतला. मग माजी कर्णधार बाबर आझमला खातेही उघडता आले नाही. शोरफुल इस्लामने बाबर आणि मसूदला बाहेरचा रस्ता दाखवला, तर हसन महमूदने शफीकला बाद केले.
सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर शान मसूद शोरिफुल इस्लामचा शिकार झाला. मसूदच्या बॅटला स्पर्श करत चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. बांगलादेशच्या खेळाडूंनी अपील केली पण पंचांनी नकार दर्शवला. मात्र, नंतर त्यांनी तिसऱ्या अम्पायरची मदत घेत पाकिस्तानच्या कर्णधाराला बाहेरचा रस्ता दाखवला. बाद घोषित करताच मसूदला विश्वासही बसला नाही. ड्रेसिंगरूममध्ये परतलेल्या शान मसूदचे हावभाव सर्वकाही सांगत होते. हा व्हिडीओ शेअर करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने OUT की NOT OUT असा प्रश्न केला.
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), अब्दुला शफीक, सैय अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली अघा, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली.
बांगलादेशचा संघ - नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकिर हसन, मोमिनूल हक, मुशफिकुर रहमान, शाकिब अल हसन, लिटन दास, महेदी हसन मिराज, शोरफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा.